ब्लॅकबेरी मोशन स्मार्टफोनची घोषणा; नव्या फिचर्सचा फोन लवकरच येणार ग्राहकांच्या भेटीला
By शेखर पाटील | Published: October 10, 2017 08:40 AM2017-10-10T08:40:03+5:302017-10-10T08:42:57+5:30
टिसीएल कंपनीने जागतिक बाजारपेठेत ब्लॅकबेरी मोशन हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे.
टिसीएल कंपनीने जागतिक बाजारपेठेत ब्लॅकबेरी मोशन हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. यात ब्लॅकबेरी कंपनीची खासियत असणारे अनेक फिचर्स असतील. ब्लॅकबेरी कंपनीचे स्मार्टफोन त्यातील क्वार्टी कि-पॅड आणि सुरक्षाविषयक फिचर्ससाठी ख्यात आहेत. मात्र ही कंपनी काळाच्या ओघात आणि खरं तर अन्य कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकली नाही. यामुळे याच्या स्मार्टफोनचा ब्रँड टिसीएल या चीनी कंपनीला विकण्यात आला आहे. आता टिसीएल या कंपनीनेच ब्लॅकबेरी मोशन या नावाने नवीन स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत ब्लॅकबेरी किवन या नावाने मॉडेल लाँच करण्यात आले होते. यातील काही फिचर्स ब्लॅकबेरी मोशनमध्ये आहे. मात्र यातील सर्वात लक्षणीय फिचर अर्थात फिजीकल बटनांनी युक्त असणार्या क्वार्टी कि-पॅडला यातून वगळण्यात आले आहे. याऐवजी यात ५.५ इंच आकारमानाचा पूर्ण टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. विशेष म्हणजे या डिस्प्लेच्या खाली ‘होम’ हे फिजीकल बटन दिलेले आहे. यावर क्लिक करून युजर सहजपणे होम स्क्रीनवर पोहचू शकतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते तब्बल दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची व्यवस्था आहे.
ब्लॅकबेरी मोशन या मॉडेलमध्ये एफ/२.० अपार्चर व ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून याच्या मदतीने ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारा असेल. यात क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.
ब्लॅकबेरी मोशन या मॉडेलमध्ये सुरक्षाविषयक अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. यात ब्लॅकबेरी कंपनीच्या ‘डीटीईके सिक्युरिटी सुट’चा समावेश आहे. याशिवाय यात अँड्रॉइड फॉर वर्क, गुगल प्ले फॉर वर्क हे फिचर्स असतील. तर या स्मार्टफोनमध्ये एनक्रिप्शनचे अभेद्य कवच देण्यात आले आहे. यामुळे याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या संदेशांचे वहन हे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेतील या स्मार्टफोनचे मूल्य ४६० डॉलर्स असून लवकरच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे.
ब्लॅकबेरी मोशन या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, युएसबी टाईप-सी आदी फिचर्स असतील.