युटीएस अॅपवर सामान्य तिकिटेही आरक्षित करा...पण ही काळजीदेखील घ्या...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:50 PM2018-11-01T15:50:43+5:302018-11-01T15:52:28+5:30
भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी युटीएस अॅपवर सुविधा सुरु केली आहे.
भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी युटीएस अॅपवर सुविधा सुरु केली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडक्यांवर लागणारी रांग कमी होणार आहे. या अॅपद्वारे केवळ काही शहरामध्येच तिकिटे काढण्याची सुविधा उपलब्ध होती.
भारतीय रेल्वेने याआधी देशातील 15 रेल्वे झोनमध्ये ही सुविधा उपलब्ध केली होती. या अॅपद्वारे आता देशातील लांबच्या रेल्वे प्रवासासाठीही तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. यामुळे मोठ्या शहरांमधील रांगा कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे. या UTS on Mobile अॅपद्वारे कसे तिकीट आरक्षण करता येईल, हे पाहुया.
प्रथम स्मार्टफोनमध्ये प्लेस्टोअरवरून UTS on Mobile हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यानंतर प्रवाशाला त्याचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता नोंदवावा लागणार आहे. यानंतर प्रवास सुरु करण्याचे स्थानक आणि अंतिम स्थानकाचे नाव अॅपवरील रकान्यात टाकावे लागणार आहे. यानंतर रेल्वे डिजिटल वॉलेट किंवा पेटीएम, मोबीक्विक या वॉलेटद्वारे तिकिटाचे पैसे भरून तिकिट आरक्षित करावे लागणार आहे.
तिकिट आरक्षित करताना एक गोष्ट महत्वाची अशी की, रेल्वे स्थानकापासून कमीतकमी 20 मीटर लांब राहूनच तिकिट काढता येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात तिकिट काढता येणार नाही. तसेच या तिकिटासाठी पेपरलेस आणि प्रिंट असे दोन पर्याय असणार आहे. प्रिंट पर्याय निवडल्यास मोबाईलवरील तिकीट अवैध असणार आहे.
याशिवाय हे तिकिट प्रवासाच्या दिवशीच काढता येणार आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या अॅपवरील तिकीटाचा स्क्रीन शॉट काढता येत नाही. यामुळे प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे हा मोबाईल असणे गरजेचे आहे. तसेच एकदा रजिस्टर केलेला मोबाईलवर दुसरा नंबर किंवा दुसऱ्या मोबाईलवर युटीएस अॅपवरील नंबर रजिस्टर होऊ शकत नाही. यासाठी अॅप डिलीट करण्याआधी पहिला नंबर डिरजिस्टर करावा लागणार आहे.
तिकिट काढल्यानंतर तपासणीसाला दाखविण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. शो बुक्ड तिकिट या ऑप्शनवर गेल्यास आरक्षित केलेले तिकिट दिसणार आहे.