‘हे’ फिचर असेल तरच स्मार्टफोनवर वापरता येणार BSNL 5G; कंपनीनं केली सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 02:53 PM2022-06-03T14:53:45+5:302022-06-03T14:54:23+5:30
BSNL नं सरकारकडे 5G स्पेक्ट्रम आरक्षित करण्याची मागणी केली आहे. 4G सर्विसबाबत केलेली चूक कंपनीला 5G बाबत करायची नाही आहे.
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे BSNL नं आपल्या 5G सेवेची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. कंपनीनं सरकारकडे 5G स्पेक्ट्रममधील 70MHz एयरवेव्स आरक्षित करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अजूनही BSNL ची 4G सेवा देखील सुरु केलेली नाही. परंतु 4G बाबत केलेली चूक सरकारी कंपनीला 5G सर्विसबाबत करायची नाही.
सरकारनं BSNL ची मागणी मान्य करून कंपनीसाठी 5G स्पेक्ट्रम आरक्षित केलं तर कंपनीला लिलावात सहभागी व्हावं लागणार नाही. फक्त 5G स्पेक्ट्रमसाठी निर्धारित केलेली किंमत द्यावी लागेल. 4G च्या बाबतीत सरकारी कंपनी खाजगी कंपन्यांपेक्षा खूप मागे राहिली आहे. कदाचित तीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून बीएसएनएलनं ही मागणी केली असावी.
रिपोर्ट्सनुसार BSNL चे CMD PK Purwar यांनी या संदर्भात एक पत्र सरकारला पाठवलं आहे. त्यात बीएसएनएल नं 3300 MHz ते 3670 MHz बँडमध्ये 70MHz च्या एयरवेव्हज BSNL 5G साठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. परंतु ही मागणी DCC (डिजिटल कम्यूनिकेशन कमीशन) नं सूचित केलेल्या वेव्ह्जपेक्षा जात आहे. DCC नं BSNL साठी 40MHz च्या एयरवेव्ह्ज आरक्षित करण्याचं सुचवलं आहे. तसेच mmWave बँडमध्ये 600 MHz बँड आणि 400MHz बँडच्या एयरवेव्ह्ज सरकारी कंपनीला मिळाव्या असं देखील डीसीसीनं सांगितलं आहे.
अंतिम निर्णय कॅबिनेटचा
फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, BSNL ची ही मागणी टेलिकॉम डिपार्टमेंट कॅबिनेटकडे पाठवेल. यावर अंतिम निर्णय कॅबीनेटकडून घेतला जाईल. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत देखील कॅबीनेटकडून लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जर या महिन्याच्या अखेरपर्यंत 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाचा आणि बीएसएनएलसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या स्पेक्ट्रमचा निर्णय देखील होऊ शकतो.
जर तुम्ही बीएसएनल ग्राहक असाल किंवा बीएसएनल 5G वापरण्याचा विचार करत असाल तर कंपनीला मिळणाऱ्या स्पेक्ट्रमला सपोर्ट करणारा स्मार्टफोन तुम्हाला घ्यावा लागेल. सध्या भारतात N78 आणि N77 हे दोन 5G बँड्स जास्त स्मार्टफोन्समध्ये मिळत आहेत. जे एक्सपर्ट्सनुसार पुरेसे आहेत.