एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल; Airtel, Vodafone आणि Jio ची अवस्था वाईट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:52 PM2024-10-26T16:52:19+5:302024-10-26T16:52:49+5:30
BSNL : दूरसंचार नियामक ट्रायच्या (टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
नवी दिल्ली : बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीला आता अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अलिकडेच केलेल्या दरवाढीनंतर मोठ्या संख्येने ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत.
दूरसंचार नियामक ट्रायच्या (टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कमी दर आणि 4-जी सेवांचे ‘सॉफ्ट लाँच’ हे देखील आहे. बीएसएनएलने जुलैमध्ये सुमारे 30 लाख नवीन ग्राहक जोडले तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.
यात प्रामुख्याने एअरटेलने 17 लाख युजर्स गमावले, तर व्होडाफोन आयडियाने 14 लाख आणि जिओने 8 लाख युजर्स गमावले आहे. ऑगस्ट महिन्यामध्येही बीएसएनएल ही एकमेव कंपनी होती.जिच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. बीएसएनएलने या महिन्यात २५ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. या कालावधीत जिओने 40 लाख, एअरटेलने 24 लाख आणि व्होडा आयडियाचे 19 लाख वापरकर्ते गमावले आहे.
दरम्यान,एकूणच बीएसएनएलचा बाजारातील वाटा हा तिच्या खासगी प्रतिस्पर्धींच्या तुलनेत खूप कमी आहे. या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस जिओ 40.5 टक्के मार्केट शेअरसह आघाडीवर आहे. तर एअरटेलचा मार्केट शेअर 33 टक्के आणि व्होडाफोन आयडीयाचा शेअर 18 टक्के आहे. ट्रायने सांगितले की, बीएसएनएलचा हिस्सा सध्या 7.8 टक्के आहे. एमटीएनएलचा 0.2 टक्के स्टेक देखील यात जोडला तर तो 8 टक्के होतो.
बीएसएनएलचे रिचार्ज दर सर्वात कमी
बीएसएनएलचे रिचार्ज दर सर्वात कमी आहेत.हे प्रति युजर्स सरासरी महसूल (ARPU) स्कोअरद्वारे सिद्ध होतात.एअरटेलचा एआरपीयू 211 रुपये, जिओचा 195 रुपये आणि व्होडाफोन आयडियाचा 146 रुपये आहे. त्या तुलनेत बीएसएनएलचा एआरपीयू सुमारे 90 रुपये इतका आहे. ही सरकारी कंपनी ग्राहकांकडून सर्वात कमी दर आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी दराचे एक कारण म्हणजे कंपनीने अद्याप अधिकृतपणे हाय-स्पीड 4-जी लाँच झालेले नाही. दुसरीकडे, जिओ आणि एअरटेलसारख्या खासगी ऑपरेटरने त्यांच्या वापरकर्त्यांचा मोठा भाग 5-जी वर ट्रान्सफर केला आहे.