BSNL ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल, एक वर्ष कॉलिंगची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 08:38 PM2017-12-26T20:38:59+5:302017-12-26T20:44:21+5:30
मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे.
मुंबई - मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. Detel D1 हा सर्वात स्वस्त फिचर मोबाइल असल्याचा दावा कंपनी करत आहे. या मोबाइलमध्ये BSNL कनेक्शन असणार आहे. पहिल्या रिचार्जची वैधता 365 दिवसांसाठी असणार आहे. मोबाइल फोनमध्ये एका वर्षापर्यंत इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय 103 रुपयांचा टॉकटाइमही दिला जात आहे. बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलसाठी प्रती मिनिट 0.15 पैसे आणि इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 0.40 पैसे प्रती मिनिट आकारण्यात येणार आहे.
Detel D1 फीचर फोनबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये 1.44 इंच मोनोक्रोम डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाइल GSM 2G नेटवर्कवर काम करेल. मात्र या मोबाइलमध्ये एकच सीमकार्ड वापरु शकणार आहात. पॉवर बॅकअपसाठी मोबाइलमध्ये 650mAH बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच टॉर्चलाइटदेखील देण्यात आली आहे. याशिवाय मोबाइलमध्ये फोन बूक आणि लाऊडस्पीकरची सुविधा असणार आहे.
रिलायन्स जिओने फ्री फोन लॉन्च केल्यापासून सर्वच कंपन्या स्वस्त मोबाइल आणण्याच्या स्पर्धेत आहेत. रिलायन्स जिओने आतापर्यंत एकदाच बुकिंग केली आहे. पहिल्याच वेळेत कंपनीकडे इतक्या ऑर्डर आल्या आहेत की, दुस-यांदा बुकिंग सुरुच करु शकले नाहीत. जिओचा फ्री फोन घ्यायचा असल्यास एक अट आहे ती म्हणजे, 1500 रुपये सेक्युरिटी म्हणून भरावे लागणार आहेत. हे पैसे कंपनी तीन वर्षानंतर परत करणार आहे. पण हे पैसे परत हवे असल्यास युजरला वर्षाला 1500 रुपयांचा रिचार्ज करणं अनिवार्य आहे. म्हणजेच तीन वर्षात 4500 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.