डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:09 PM2024-10-19T13:09:39+5:302024-10-19T13:11:12+5:30
बीएसएनएलने सामान्य फोनच्या माध्यमातून सॅटेलाईटला दुसऱ्या फोनवर पाठविम्यासाठी मेसेज पाठविला होता.
तब्बल ३६००० किमीवरून अंतराळातून भारतात सॅटेलाईटद्वारे मेसेज पाठविण्यात बीएसएनएलला यश आले आहे. साध्या स्मार्टफोनद्वारे हा मेसेज अंतराळातील सॅटेलाईकडे पाठविण्यात आला होता. तो मेसेज ज्या व्यक्तीला पाठविला त्याला तो काही सेकंदात डिलिव्हर देखील झाला. अमेरिकी कंपनीसोबत मिळून भारताने नवीन सॅटेलाईट कम्युनिकेशन टेक्निक विकसित केली आहे. याचीच ही ट्रायल होती जी भविष्यात कॉलिंग आणि इंटरनेटसाठी देखील वापरता येणार आहे.
मस्क यांची स्टारलिंक, मित्तल यांची वन वेब सारख्या कंपन्या भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या प्रतिक्षेत असताना बीएसएनएलने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
बीएसएनएलने सामान्य फोनच्या माध्यमातून सॅटेलाईटला दुसऱ्या फोनवर पाठविम्यासाठी मेसेज पाठविला होता. तो काही सेकंदात अंतराळातील हजारो किमी दूर असलेल्या सॅटेलाईटवरून पुन्हा भारतातच असलेल्या दुसऱ्या मोबाईलवर पोहोचला. अंतराळ आणि पृथ्वीवर दोन्ही बाजुंनी कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी दिल्लीच्या बाहेर लँडिंग स्टेशन बनविण्यात आले आहेत. यासाठी अमेरिकेची सॅटकॉम नावाच्या कंपनीने सॅटेलाईट लिंक पुरविली आहे. ही कंपनी बीएसएनएलसोबत डायरेक्ट टू डिव्हाईस सेवा पुरविण्यासाठी तयारी करत आहे. याद्वारे रेग्युलर स्मार्टफोनवर सॅटेलाईटद्वारे मेसेजचे आदान प्रदान करता येणार आहे.
आतापर्यंत यासाठी सॅटेलाईट फोन वापरले जात होते. आता मोबाईलद्वारेच हे सर्व केले जाणार आहे. आता ज्या मेसेजिंग पद्धतीचे प्रदर्शन करण्यात आले ते एसओएस किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी होते. येत्या काळात हे तंत्रज्ञान कॉलिंग, इंटरनेट आदीसाठी वापरले जाणार आहे. वायसेटचे एमडी गौतम शर्मा यांनी भारत ही आपल्यासाठी महत्वाची बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. जिथे सेल्युलर कनेक्टिव्हिटी नाही तिथे या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
वायसॅट ही कंपनी अमेरिकेसारख्या देशात थेट घरांमध्ये ब्रॉडबँड कनेक्शन पुरविते. भारतात ही सेवा पुरविण्यासाठी एअरटेल, मस्क यांची कंपनी उत्सुक आहे. परंतू, त्यांना अद्याप याची परवानगी मिळालेली नाही. बीएसएनएल या क्षेत्रात उतरल्यास भारतीयांना महागड्या सेवेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय दऱ्या खोऱ्यांत असलेली गावखेडीही जोडता येणार आहेत.