BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:17 PM2024-10-07T15:17:25+5:302024-10-07T15:17:54+5:30
BSNL : कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन योजना आणत आहे. बीएसएनएल अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.
नवी दिल्ली : एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन-आयडिया (VI) द्वारे रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे (BSNL) आपला मोर्चा वळविला आहे. रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर अनेकांनी बीएसएनएलमध्ये आपले मोबाईल नंबर पोर्ट केले आहेत. दरम्यान, कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन योजना आणत आहे. बीएसएनएल अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.
बीएसएनएल सतत ४ जी नेटवर्कवर काम करत आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅन आणि ४ जी नेटवर्कनंतर आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. सततच्या स्पॅम कॉल्सच्या समस्येमुळे ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेत कंपनीने ही नवीन सेवा सुरु केली आहे. ग्राहक कंपनीच्या सेल्फकेअर ॲपवर स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजबद्दल तक्रार नोंदवू शकतात.
सेल्फकेअर ॲप
स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी बीएसएनएलने एक उत्तम मार्ग अवलंबला आहे. आता तुम्ही तुमच्या बीएसएनएल नंबरवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजबद्दल लगेच तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीचा सेल्फकेअर ॲप मदत करणार आहे. बीएसएनएल ग्राहक सेल्फकेअर ॲपच्या मदतीने स्पॅम कॉल्स आणि मेसेजबद्दल तक्रार नोंदवू शकतात.
१८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक
दरम्यान, सध्या स्पॅम कॉल आणि मेसेजची समस्या प्रचंड वाढली आहे. याबाबत दूरसंचार विभागाने देखील अनेकदा कठोर पावले उचलली आहेत. फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. आता ग्राहकांना येणारे फेक कॉल्स आणि मेसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील. ट्रायने घोटाळेबाजांना जोरदार झटका दिला असून गेल्या काही दिवसांत १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स आणि ६८० एंटिटीज (संस्थांना) ब्लॉक केल्या आहेत.
सेल्फकेअर ॲप अशा प्रकारे वापरू शकता..
- सर्वप्रथम तुमच्या फोनवर BSNL सेल्फकेअर ॲप ओपन करा.
- आता तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि Complaint and Preference पर्याय निवडावा लागेल.
- नंतर उजवीकडे तीन-लाइन मेनू टॅप करा आणि रिपोर्ट करा.
- आता तुम्हाला New Complaint वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉईस कॉलमधील पर्याय निवडावा लागेल. आणि नंतर संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
- शेवटी, माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.