'या' राज्यातील BSNL चे ग्राहक मोफत पाहू शकतील लाइव्ह टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:03 IST2025-01-07T10:02:43+5:302025-01-07T10:03:23+5:30
BSNL New Service : आता कंपनी आपल्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम सारखे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याचा लाभ देणार आहे.

'या' राज्यातील BSNL चे ग्राहक मोफत पाहू शकतील लाइव्ह टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्म
BSNL New Service : नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफर आणत आहे. आता कंपनी आपल्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम सारखे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याचा लाभ देणार आहे.
कंपनीचे फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना हा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही खर्चाशिवाय कनेक्शनसह इंट्रानेट टीव्ही सेवा दिली जाईल. ही सेवा बिहारमध्ये लवकरच सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएनएलचे फायबर टू द होम (FTTH) नेटवर्क वापरणारे ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
ग्राहकांना मोफत इंट्रानेट फायबर लाईव्ह टीव्ही सुविधा मिळणार आहे. यामध्ये कंपनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल पाहण्याची सुविधा देते. ही सेवा सर्वात आधी गया, मुझफ्फरपूर, भागलपूर, पाटणा आणि दरभंगा येथे सुरू होईल. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करण्यात येणार आहे.
बीएसएनएलच्या या सेवेमध्ये ग्राहक कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता ओटीटी आणि टीव्ही चॅनेल पाहू शकतील. यामध्ये नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार इत्यादींचाही समावेश असणार आहे. याशिवाय त्यांना या प्लॅनमध्ये गेमिंग चॅनेलही मिळतील. ही सुविधा फक्त स्मार्ट टीव्हीवरच मिळू शकते. यामध्ये यूजरला डेटाची काळजी करण्याची गरज नाही.
'या' राज्यांमध्येही ही ऑफर सुरू
बीएसएनएलची ही ऑफर आधीच मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब सारख्या राज्यांच्या अनेक शहरांमध्ये सुरू आहे. या ऑफरची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचे फायदे प्रत्येक FTTH प्लॅनवर उपलब्ध आहेत. बीएसएनएल सध्या या सेवेची चाचणी घेत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामध्ये ग्राहकांना कोणताही विलंब किंवा बफरिंग न करता लाईव्ह स्ट्रीमिंग मिळत आहे. हे पूर्णपणे बीएसएनएल नेटवर्कवर चालते.