आनंदाची बातमी! BSNL देणार सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट; वाचा, डिटेल्स
By देवेश फडके | Published: January 18, 2021 07:11 PM2021-01-18T19:11:33+5:302021-01-18T19:14:06+5:30
देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे.
१ फेब्रुवारी २०२१ पासून BSNL ची ही खास योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. आपण सरकारीकर्मचारी असाल, तर आता तुम्हाला बीएसएनएलकडून काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात मिळू शकेल. बीएसएनएलच्या लँडलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम यापैकी कोणतीही सर्व्हिस घेतल्यास एकूण रकमेवर १० टक्के सूट बीएसएनएलकडून दिली जाणार आहे.
आताच्या घडीला सरकारी कर्मचारी असलेले किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. BSNL च्या या खास योजनेसाठी नियम आणि अटी यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गतवर्षी सरकारी विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांना BSNL किंवा MTNL चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आपापल्या गरजेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी BSNL किंवा MTNL चे प्लान घ्यावेत, असे सांगण्यात आले होते. BSNL आणि MTNL डबघाईला आले असून, अन्य कंपन्यांशी स्पर्धा करणे दोन्ही कंपन्यांसाठी कठीण होत चालले आहे.
दरम्यान, बीएसएनएलकडून ब्रॉडबँड आणि भारत फायबर ग्राहकांसाठी ओटीटी अॅड ऑन पॅकची घोषणा करण्यात आली आहे. यातून Vi, Airtel, Jio कडे वाढत चाललेला युझर्सचा कल पुन्हा एकदा BSNL वळावा, यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.