जिओ, एअरटेलला मागे टाकणार BSNL; सरकारच्या प्लॅनमध्ये टाटा देणार साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:55 PM2024-09-04T14:55:36+5:302024-09-04T15:02:16+5:30
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल लवकरच आपले 4G नेटवर्क आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.
BSNL 4G Rollout : बीएसएनएल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकार आता बीएसएनएलसाठी स्वतंत्र गुंतवणुकीचा मार्ग शोधत आहे. यासाठी ६००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीचेही वाटप करण्यात आले आहे. बीएसएनएलकडून 4जी नेटवर्क आणण्यास बराच वेळ लागत असल्याने कंपनीचा ग्राहकवर्गही कमी होत आहे. कमी होत असलेला ग्राहकसंख्या लक्षात घेऊन सरकारने गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे.
सरकारने बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कच्या विस्तारावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं आहे. याअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशभरात बीएसएनएलचे ७५ हजार टॉवर बसवण्याची योजना आहे. या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकार बीएसएनएलला अतिरिक्त ६,००० कोटी रुपये देण्याची योजना आखत आहे. बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कच्या कव्हरेजमध्ये घट झाल्यामुळे कंपनीला ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे दूरसंचार विभाग लवकरच मंत्रिमंडळाकडे या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संपर्क करणार असल्याचे समोर आलं आहे.
जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत 4जी सेवेत मागे पडल्यामुळे बीएसएनएल युजर्स तयार करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. पण बीएसएनएलचा नुकताच प्लॅन समोर आल्यानंतर बीएसएनएलचा यूजर बेस वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी, एक लाख 4जी साइट्सच्या रोलआउटसाठी १९,००० कोटी रुपयांची आगाऊ खरेदी ऑर्डर देण्यात आली होती. पण जेव्हा नेटवर्क विस्तारासाठी वास्तविक खरेदी ऑर्डर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि बीएसएनएलला देण्यात आली तेव्हा त्याची किंमत सुमारे १३,००० कोटी रुपये होती. उर्वरित रक्कम ६००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत, सरकारने २०१९ पासून 4जी सेवांच्या रोलआउटसह पॅकेजचा भाग म्हणून बीएसएनएल आणि एमटीएनलमध्ये सुमारे ३.२२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे बीएसएनएलसाठी उपकरणे तयार केली जात आहेत. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांना १३ हजार कोटी रुपयांची देणी देण्यात आली असून ६ हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहे. मात्र आता सरकार बीएसएनएल पुन्हा एकदा लोकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी योजना आखत आहे.
बीएसएनएल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. बीएसएनएल 5जी देखील लवकरच येत आहे. यामध्ये वेगवान इंटरनेट आणि मजबूत नेटवर्कचा आधार बनवण्यात आला आहे. त्याची चाचणीही सरकारने पूर्ण केली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या नेटवर्कवरून व्हिडिओ कॉल केला आहे. त्यामुळे सरकार देखील युजर्संची संख्या वाढवण्यासाठी मजबूत नेटवर्कवर काम करत आहे.