आधार नंबर माहीत झाल्यास बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:45 IST2020-10-07T04:29:09+5:302020-10-07T06:45:04+5:30
Aadhaar card bank account hack: एखाद्याच्या हाती आधारचा नंबर लागला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी अनेकांना आजही भीती असते.

आधार नंबर माहीत झाल्यास बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का?
आधार कार्डचा डेटा लीक होण्याच्या अनेक बातम्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना धडकी भरली होती. एखाद्याच्या हाती आधारचा नंबर लागला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी अनेकांना आजही भीती असते. पण यावर आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
आधार नंबर इतरांना माहीत झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते का?
नाही, असे होत नाही. जसे केवळ तुमच्या एटीएम कार्डचा नंबर माहीत असेल तर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येत नाहीत, तसेच केवळ आधार नंबर माहीत असल्यानंतर कोणालाही तुमचे बँक अकाउंट हॅक करता येत नाही. जोवर तुम्ही पीन/ओटीपी एखाद्या व्यक्तीला/हॅकरला शेअर करत नाहीत, तोवर तुमचे बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही.
इतर व्यवहारांनाही आधार लिंक असेल तर?
इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी, जसे की म्युच्युअल फंड, शेअरसाठीचे डिमॅट अकाउंट किंवा मोबाइल कनेक्शनसाठी आधारचा नंबर दिलेला असतो. पण, त्यामुळे त्याचा कोणत्याही बँक अकाउंटवर परिणाम होत नाही.
तुमच्या आधार कार्डचा नंबर जर एखाद्या व्यक्तीला माहीत झाला किंवा आधीच माहीत असेल तर तुमच्या बँक अकाउंटला धक्काही लागणार नाही, असा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केला आहे. आतापर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.
आधार कार्डचा नंबर इतर कोणालाही माहीत असेल तर त्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे कोणतीही घटना अद्याप घडलेली नसल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे.