ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी युक्त कार्बन फ्रेम्स एस ९
By शेखर पाटील | Published: May 10, 2018 01:21 PM2018-05-10T13:21:20+5:302018-05-10T13:21:20+5:30
कार्बन कंपनीने फ्रेम्स एस९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात ड्युअल फ्रंट कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत.
कार्बन कंपनीने फ्रेम्स एस९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात ड्युअल फ्रंट कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. अलीकडेच बहुतांश स्मार्टफोन्समध्ये उत्तम दर्जाच्या सेल्फी कॅमेर्यांना प्राधान्य दिले जात आहे. यातच ड्युअल कॅमेर्यांच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्यामुळे आता ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी युक्त असणारे स्मार्टफोन प्रचलीत होत आहेत. या पार्श्वभूमिवर, कार्बन फ्रेम्स एस९ या स्मार्टफोनमध्येही याच प्रकारे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत एलईडी फ्लॅशयुक्त ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. तर याच्या मागील बाजूसदेखील ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, कार्बन फ्रेम्स एस ९ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण दिलेले आहे. क्वाड कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात २,९०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे.
कार्बन फ्रेम्स एस ९ या मॉडेलचे मूल्य ६,७९० रूपये असून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टल्ससह देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबत एयरटेलची २,००० रूपयांची कॅशबॅक ऑफर प्रदान करण्यात आली आहे.