ड्युअल स्पीकर्सयुक्त कार्बन के९ म्युझिक
By शेखर पाटील | Published: December 22, 2017 03:24 PM2017-12-22T15:24:57+5:302017-12-22T16:12:38+5:30
कार्बन कंपनीने ड्युअल स्पीकरची सुविधा असणारा के९ म्युझिक हा स्मार्टफोन ४,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.
कार्बन कंपनीने ड्युअल स्पीकरची सुविधा असणारा के९ म्युझिक हा स्मार्टफोन ४,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. कॅमेरा, बॅटरी, रॅम आणि स्टोअरेज आदींप्रमाणे संगीत हादेखील स्मार्टफोनचा महत्वाचा निकष आहे. अनेक प्रिमीयम मॉडेल्समध्ये उत्तम दर्जाच्या ध्वनी प्रणाली देण्यात आलेल्या असतात. या अनुषंगाने कार्बन कंपनीने आपल्या के९ या किफायतशीर दरातील स्मार्टफोनमध्ये संगीत प्रेमींसाठी खास सुविधा दिलेली आहे. यात वर नमूद केल्यानुसार ड्युअल स्पीकर्स असतील. याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या संगीताचा आनंद घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या जोडीला कंपनीने सावन या म्युझिक स्ट्रीमिंग अॅपचे तीन महिन्यांपर्यंतचे मोफत सबस्क्रीप्शनही ग्राहकाला देऊ केले आहे.
कार्बन के९ म्युझिक या मॉडेलमधील अन्य फिचर्सचा विचार केला असता, यात पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हीजीए क्षमतेचा (८५४ बाय ४८० पिक्सल्स) डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात लिथिअम-आयन या प्रकारातील २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर ८ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.
कार्बन के९ म्युझिक या मॉडेलमध्ये ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान केले आहेत.