सावधान...! स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटले; 9 मुले एम्समध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:31 PM2019-08-22T13:31:11+5:302019-08-22T13:32:11+5:30
जर तुमच्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले असेल तर सावध व्हा. त्यांना फोन वापरण्यापासून रोखा. अन्यथा त्यांचे दात तुटू शकतात.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळे खराब होत असल्याचे माहिती होते. मात्र, अशा घटना घडल्या आहेत की स्मार्टफोन वापरताना लहान मुलांचे दात तुटले आहेत. होय, भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)नेच हा अहवाल दिला आहे. यामुळे पालकांना मुलांना मोबाईल देताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
जर तुमच्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले असेल तर सावध व्हा. त्यांना फोन वापरण्यापासून रोखा. अन्यथा त्यांचे दात तुटू शकतात. ओठही फाटू शकतात. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. एम्सच्या दंत चिकित्सा विभागाने हा इशारा दिला आहे.
लहान मुलांना फोनचे व्यसन लागले असल्यास ती झोपून मोबाईलवर खेळ खेळत असतात. अशावेळी तोंडावर मोबाईल असतो. एका मोबाईलचे वजन 170 ते 250 ग्रॅम असते. यामुळे हे फोन मुलांच्या हातातून निसटल्यास थेट तोंडावर पडतात. यामुळे मुलांचे दात तुटतात. तसेच ओठही फाटतात. अशाप्रकारे दात तुटल्याच्या नुकत्याच 9 घटना समोर आल्या आहेत. या मुलांना एम्समध्ये भरती करण्यात आले होते. यातील काहींच्या ओठांवर टाके घालून शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
एम्सच्या डेंटल विभागाचे डॉक्टर विजय माथूर आणि नितेश तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. फोनमुळे दात तुटल्याच्या मुलांचे वय तीन ते आठ वर्षे होते. यापैकी सात मुले झोपून फोनवर गेम खेळत होते. यावेळी हा फोन त्यांच्या तोंडावर पडला आणि जखमा झाल्या. हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्यांपैकी दोन जणांचे दात तुटले होते. तर काही जणांचे ओठ फाटले होते आणि दात हलले होते.
यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देताना डोळ्यांसोबत आता दातांचीही काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कारण मुलाचा चेहरा खराब झाल्यास भविष्यात कुरुपपणा येण्याची शक्यता आहे.