मोबाइल पोर्टेबिलिटी सुविधेसाठीच्या दर आकारणीत होणार कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:05 AM2019-08-20T06:05:00+5:302019-08-20T06:05:12+5:30
एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
मुंबई : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) करण्यासाठी सध्या आकारण्यात येणारे १९ रुपये शुल्क कमी करून, ५ रुपये ७४ पैसे करण्याचा प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) मांडला आहे. याबाबत सर्व संबंधितांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या लवकरात लवकर नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. २००९ पासून ही सेवा ग्राहकांना पुरविण्यात येत आहे. या सेवेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आता प्रति एमएनपी घेतला जाणारा दर कमी करण्याचा प्रस्ताव असला, तरी तो मंजूर होण्याची गरज आहे. यापूर्वी जानेवारी, २०१८ मध्ये या दरात ८० टक्क्यांची घट करून प्रति एमएनपी हा दर ४ रुपये करण्यात आला होता. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.
गेल्या तीन वर्षांत एमएनपी झालेल्या ग्राहकांची संख्या व त्यासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च, यावर हा प्रस्ताव आधारित असल्याचे ट्रायकडून सांगण्यात आले. याबाबत ज्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी लेखी स्वरूपात याबाबत म्हणणे मांडावे, असे आवाहन ट्रायने केले आहे.
यापूर्वी एमएएनपी करण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता ती मुदत दोन दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन दिवसांत एमएनपीची प्रक्रिया पूर्ण करून नवीन सेवेचा लाभ घेता येणे शक्य होऊ शकेल. याबाबत ट्रायशी ०११२३२३४३६७ या क्रमाकांवर संपर्क साधता येऊ शकेल. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर एमएनपी सुविधेचा लाभ घेणाºया ग्राहकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
...तर ३० सप्टेंबरपासून अंमलबजावणी
मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी सध्या आकारण्यात येणारे १९ रुपये शुल्क कमी करून ते ५ रुपये ७४ पैसे करण्याचा ट्रायचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यास ३० सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.