OnePlus चा ‘हा’ फोन देतोय हाताला चटके; 60.4 डिग्री सेल्सियसपर्यंत होतोय गरम, फास्ट चार्जिंग भोवणार?
By सिद्धेश जाधव | Published: May 5, 2022 05:37 PM2022-05-05T17:37:45+5:302022-05-05T17:38:05+5:30
OnePlus 10R स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. परंतु या फोनच्या चिनी व्हर्जन अर्थात OnePlus Ace खूप जास्त तापत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत.
OnePlus 10R स्मार्टफोन नुकताच भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. भारतात येण्यापूर्वी चीनमध्ये हा फोन OnePlus Ace नावाने लाँच झाला होता. हा हँडसेट ओव्हर हिट होत असल्याची तक्रार चिनी युजर्स करत आहेत. अनेक युजर्स ही तक्रार करत असल्यामुळे हा मुद्दा चिनी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये देखील आला होता. कंपनीनं मात्र ही साधारण बाब असल्याचं म्हटलं आहे.
चीनी न्यूज वेबसाईट सिना फायनान्सनुसार, एका वीबो युजरनं अलीकडेच नवीन OnePlus Ace स्मार्टफोन विकत घेतलं होता. एक दिवस वापरल्यानंतर युजरला ओवरहीटिंगची समस्या जाणवू लागली होती. जास्त तापल्यामुळे स्मार्टफोन हातात देखी पकडता येत नव्हता. विषयी इतका गंभीर होता की अनेक वनप्लस एस युजर्सनी आपली तक्रार सोशल प्लॅटफॉर्मवर मांडली आणि ‘#OnePlus_Phones_So_Hot_That_It_Burns_Hands’ हा टॅग ट्रेंड होऊ लागला.
युजरच्या पोस्टनुसार, स्मार्टफोनवर फक्त एक तास मोबाईल गेम खेळल्यावर फोनच्या बॅटरीचं तापमान 43.7 डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहोचलं, तर सीपीयूचं तापमान 46.5 डिग्री सेल्सियस होतं. अन्य Weibo युजर्सच्या मते त्यांची OnePlus Ace ची बॅटरी 44.6 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त गरम होती आणि सीपीयूचं तापमान 60.4 डिग्री सेल्सियस वर पोहोचलं होतं.
वनप्लसची बाजू
या मुद्द्याविषयी OnePlus नं Sina Finance शी संपर्क करून उत्तर दिलं आहे. त्यानुसार गेमिंग करताना फोन गरम होणं साहजिक आहे. युजर्सच्या फोनचं तापमान वाढणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे स्मार्टफोनच्या रोजच्या आयुष्यातील कार्यक्षमतेवर कोणताही प्रभाव पडणार नाही.