गॅलेक्सी टॅब एस ४ लवकरच बाजारपेठेत होणार दाखल
By शेखर पाटील | Published: May 9, 2018 04:59 PM2018-05-09T16:59:28+5:302018-05-09T16:59:28+5:30
या मोबाईलचा मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे.
मुंबई: सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस ४ हा नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारणार असून विविध लीक्सच्या माध्यमातून याची माहिती समोर आली आहे.
स्मार्टफोन उत्पादनात आयफोनच्या आव्हानाला पुरून उरत सॅमसंग कंपनीने जागतिक पातळीवर आपला दबदबा कायम राखला आहे. यासोबत टॅबलेटच्या क्षेत्रात आयपॅडला टक्कर देण्यासाठीही या कंपनीला सातत्याने कसरत करावी लागत आहे. या अनुषंगाने लवकरच सॅमसंग कंपनी गॅलेक्सी टॅब एस ४ या नावाने नवीन मॉडेल सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच या मॉडेलचे अनावरण होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, याऐवजी आता हा टॅबलेट बर्लीन शहरात होणार्या ‘आयएफए-२०१८’ या फेस्टमध्ये सादर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच वाय-फाय अलायन्सच्या संकेतस्थळावर या मॉडेलचे रजीस्ट्रेशन करण्यात आले असून याच्या माध्यमातून याचे सर्व फिचर्स जगासमोर आले आहेत.
या लिस्टींगचा विचार केला असता, सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस ४ या मॉडेलचे वाय-फाय आणि एलटीई असे दोन व्हेरियंट असतील. अर्थात यातील एका मॉडेलमध्ये फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असून दुसऱ्यात यासोबत सीमकार्ड वापरण्याची सुविधा दिलेली असेल. यात १०.५ इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर दिलेला असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. तसेच यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असल्याचे या लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. यात एक्सटर्नल कि-बोर्ड वापरता येणार असून यासोबत स्टायलस पेनचा सपोर्टदेखील असेल. या मॉडेलचे अन्य फिचर्स आणि मूल्याबाबत मात्र यामध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही.