कोमिओ एक्स १ स्मार्टफोनची घोषणा : बोके इफेक्टसह विविध फिचर्सचा समावेश
By शेखर पाटील | Published: July 24, 2018 05:37 PM2018-07-24T17:37:15+5:302018-07-24T17:46:24+5:30
कोमिओ एक्स १ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला असून यात दर्जेदार कॅमेर्यासह विविध उपयुक्त फिचर्सचा समावेश आहे
कोमिओ एक्स १ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला असून यात दर्जेदार कॅमेर्यासह विविध उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. कोमिओ कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला पाया मजबूत करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने संबंधित कंपनीने मे महिन्यात कोमिओ एक्स१ नोट हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. आता याचीच नवीन आवृत्ती एक्स १ या मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य ७,४९९ रूपये आहे. याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लुझ आणि पेटीएमवरून ऑनलाईन तर देशभरातील विविध शॉपीजमधून ऑफलाईन पध्दतीत या स्मार्टफोनला खरेदी करता येणार आहे. याला रेड हॉट, सनराईज गोल्ड आणि रॉयल ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एक्स-१ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी ६७३९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेर्यामध्ये ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश आदी फिचर्स देण्यात आले आहेत. वर नमूद केल्यानुसार यात बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून विविध फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये पोर्ट्रेट मोड, स्माईल जेस्चर, फेस क्युट, फेस एज आदी फिचर्सचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेर्याच्या माध्यमातून यामध्ये फेस अनलॉक हे फिचर वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. एक्स-१ हा स्मार्टफोन ग्रामीण भागातील युजर्सला वापरण्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे. यासाठी यामध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. यामुळे इंग्रजी समजण्याची अडचण असणारा युजर याला अगदी सहजपणे वापरू शकणार आहे. या मॉडेलसाठी कोमिओने काही ऑफर्स देऊ केल्या आहेत. यामध्ये एक वर्ष + १०० दिवस इतक्या दिवसांची वॉरंटी देण्यात आलेली आहे. यासाठी स्वतंत्र बायबॅक आणि एक्सचेंज ऑफरदेखील सादर करण्यात आली आहे. जिओने यासाठी २,२०० रूपयांची कॅशबॅक ऑफरदेखील सादर केली आहे.