युट्युबला टक्कर देणार अमेझॉनट्युब !

By शेखर पाटील | Published: December 22, 2017 12:51 PM2017-12-22T12:51:55+5:302017-12-22T12:52:55+5:30

गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमधील अलीकडच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर अमेझॉनने अमेझॉनट्युब या नावाने युट्युब प्रमाणेच व्हिडीओ सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Competition between AmazonTube and You Tube | युट्युबला टक्कर देणार अमेझॉनट्युब !

युट्युबला टक्कर देणार अमेझॉनट्युब !

गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमधील अलीकडच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर अमेझॉनने अमेझॉनट्युब या नावाने युट्युब प्रमाणेच व्हिडीओ सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेझॉन कंपनीने ट्रेडमार्कसाठी दोन सेवांचे अ‍ॅप्लिकेशन सादर केले आहे. यात अमेझॉनट्युब आणि ओपनट्युब अशा नावांनी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत टीव्ही आन्सर मॅन या टेक पोर्टलने वृत्त प्रकाशित केले आहे. यानुसार या दोन्ही नावांनी अमेझॉनने नवीन सेवा सुरू करण्याच्या हालचालीस प्रारंभ केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील अमेझॉनट्युब या नावाने नवीन व्हिडीओ स्ट्रीमिंग/शेअरिंग सेवा सुरू होऊ शकते.

गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमध्ये अलीकडच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुगलने आपल्या युट्युब या अ‍ॅपला १ जानेवारीपासून अमेझॉन इको शो हा डिस्प्लेयुक्त स्मार्ट स्पीकर आणि फायर टीव्हीवरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. इको शो हे प्रॉडक्ट अलीकडेच सादर करण्यात आले होते. यावरून युट्युब हटविल्याचा फारसा फरक पडणारा नाही.

तथापि, फायर टीव्हीच्या मदतीने स्मार्ट उपकरणे टीव्हीला जोडून पाहणा-यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. अमेझॉन हे जगातील आघाडीचे शॉपिंग पोर्टल आहे. यावरून गुगल कंपनीचे क्रोमकास्ट तसेच गुगल होम आदींसारखे प्रॉडक्ट विकण्यास अमेझॉन टाळाटाळ करत आहे. कारण यांची अमेझॉनच्या उत्पादनांशी थेट स्पर्धा आहे. यामुळे गुगलने युट्युब हटविण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. अलीकडच्या हालचालींचा मागोवा घेतला असता या दोन्ही कंपन्यांमध्ये समेट होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र युट्युबच्या मिरासदारीला आव्हान देण्यासाठी अमेझॉनने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यानुसार या सेवा सुरू करण्याच्या हालचालीस प्रारंभ करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title: Competition between AmazonTube and You Tube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.