जिओ पेमेंट्स बँक महिनाअखेर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:42 AM2017-12-06T03:42:41+5:302017-12-06T03:43:03+5:30
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूह व स्टेट बँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली जियो पेमेंट्स बँक या डिसेबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूह व स्टेट बँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली जियो पेमेंट्स बँक या डिसेबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. जियो पेमेंट्स बँकेत रिलायन्स समूहाचे ७० टक्के तर स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३० टक्के भांडवल आहे. स्टेट बँकेजवळ ग्राहकांची ४२ कोटी खाती आहेत तर रिलायन्सच्या ‘जियो फोर-जी’ फोनचे १३ कोटी ग्राहक आहेत व त्यात झपाट्याने वाढ होत आहे. जियोच्या या ‘फोर-जी’ नेटवर्कचा उपयोग ज्या ठिकाणी बँका नाहीत अशा दुर्गम खेड्यात बँकिंग सेवा पुरविण्यासाठी होऊ शकतो. म्हणून स्टेट बँकेने जियोशी हातमिळवणी केल्याचे सूत्रांना वाटते.
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २०१६ साली पेमेंट्स बँकेसाठी एकूण ११ बड्या कंपन्यांना परवाने दिले होते. त्यात रिलायन्स समूह, आदित्य बिर्ला समूह, एअरटेल, चोलामंडलम समूह, टेक-महिन्द्र, सन फार्मा, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी आजवर चार पेमेंट्स बँका सुरू झाल्या आहेत. त्यात पेटेम इंडिया पोस्ट, फिनो पेटेक व एअरटेलचा समावेश आहे. जियो पेमेंट्स बँक व्यवसाय सुरू करणारी पाचवी पेमेंट्स बँक असेल.
पेमेंट्स बँकांची संकल्पना नवी आहे व ती सतत वाढत असलेल्या डिजिटल (आॅनलाईन) पेमेंटससाठी सुरू केली आहे. इतर व्यावसायिक बँकांप्रमाणे पेमेंट्स बँका ग्राहकांना कर्ज मंजूर करत नाहीत व एका ग्राहकाकडून फक्त एक लाख रुपये एवढीच ठेव स्वीकारू शकतात. पेमेंट्स बँका ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. पण एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, ई-वॉलेट, मोबाईल वॉलेट यासोबतच पैसे एका खात्यातून दुसºया खात्यात पाठवणे या सेवा पुरवितात व यावर जे कमिशन मिळते ते या बँकांचे उत्पन्नाचे साधन असते.