संगणकाच्या उत्पादनात सातत्याने घट
By शेखर पाटील | Published: April 16, 2018 01:05 PM2018-04-16T13:05:12+5:302018-04-16T13:05:12+5:30
कधी काळी कंप्युटींगसाठी डेस्कटॉप संगणक हाच एकमेव पर्याय होता.
स्मार्टफोनसह अन्य आटोपशीर आकाराच्या उपकरणांमध्ये संगणकाच्या उत्पादनात लागोपाठ १४व्या तिमाहीत घट झाली असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. कधी काळी कंप्युटींगसाठी डेस्कटॉप संगणक हाच एकमेव पर्याय होता. काळाच्या ओघात लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन आदी उपकरणे आल्यामुळे संगणकाची लोकप्रियता कमी झाली. आता तर तब्बल ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजचे स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. अर्थात संगणकाप्रमाणेच कार्यक्षम आणि गतीमान स्मार्टफोन आता उपलब्ध आहेत. तर काही लॅपटॉपचे मॉडेल्स हे नियमित वापरातील संगणकाप्रमाणेच अतिशय शक्तीशाली फिचर्सने सज्ज आहेत. याचा सरळ फटका हा संगणकाची लोकप्रियता कमी होण्यात झाला आहे. याचेच प्रतिबिंब गार्टनर या रिसर्च फर्मच्या २०१८च्या पहिल्या तिमाहीतील संगणकाच्या विक्रीच्या अहवालात उमटले आहे. या अहवालानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर ६.१८ कोटी संगणकांची विक्री झाली. गत म्हणजेच २०१७च्या या कालखंडातील विक्रीपेक्षा हा आकडा १.४ टक्क्यांनी कमी आहे. तब्बल १४व्या तिमाहीत संगणक विक्रीत घट झाल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. २०१२च्या दुसर्या तिमाहीपासून (एप्रिल ते जून) आजवर संगणक विक्री सातत्याने कमी होत आहे. याला विद्यमान तिमाहीदेखील अपवाद नसल्याचे या अहवालाने अधोरेखीत केले आहे.
जागतिक पातळीवरील विचार करता चीनमध्ये गत तिमाहीत संगणक उत्पादनात तब्बल ५.७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याचप्रमाणे आशिया, अमेरिका आदींमध्ये संगणक उत्पादनात घट आली आहे. अन्य भागांमध्ये संगणक उत्पादन वाढले असले तरी ते फार अल्प प्रमाणातील आहे. संगणक उत्पादनात एचपी, लेनोव्हो आणि डेल या कंपन्या अनुक्रमे पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर असून या तिघांचा एकत्रीत वाटा तब्बल ५६.९ टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हाच वाटा ५४.५ टक्के होता. विद्यमान तिमाहीत डेल कंपनीने जोरदार मुसंडी मारत ६.५ टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे.