गुगल कॅलेंडरचा कायापालट : अनेक नवीन फिचर्सचा समावेश
By शेखर पाटील | Published: October 19, 2017 11:25 AM2017-10-19T11:25:18+5:302017-10-19T12:30:13+5:30
गुगल कॅलेंडरच्या वेब आवृत्तीचे ताजे अपडेट युजर्सला सादर करण्यात आले असून यात नवीन डिझाईनच्या माध्यमातून या सेवेचा कायापालट करण्यात आला आहे.
गुगल कॅलेंडर हे डिजीटल प्लॅनिंग टुल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. वेबसह अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्तीसाठी ही सेवा उपलब्ध आहे. यातील वेब आवृत्तीचे ताजे अपडेट जगभरातील युजर्सला सादर करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल हा अर्थातच युजर इंटरफेसचा आहे. गुगल कॅलेंडरचा पार्श्वभाग हा मटेरियल डिझाईननुसार बदलण्यात आला आहे. यातील रंगसंगती ही अधिक आकर्षक आणि डोळ्यांना सुखावणारी असेल. या नवीन आवृत्तीत रिस्पॉन्सीव्ह लेआऊट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात ब्राऊजर आणि डिस्प्लेच्या आकारानुसार तो आपोआप अॅडजस्ट होईल. यामुळे युजरला गुगल कॅलेंडर वापरणे हे अधिक सुलभ होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
डिझाईनमधील बदलासोबत गुगल कॅलेंडरच्या ताज्या आवृत्तीत काही नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यात आता कुणीही आपल्या इंटरफेसवर आपल्या कंपनी वा प्रतिष्ठानच्या नावासह अन्य माहिती टाकू शकतो. म्हणजे अमुक-तमुक कंपनीची मिटींग असल्यास यात त्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करता येणार आहे. विशेष करून कार्पोरेट क्षेत्रासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. यात फॉर्मेट केलेले टेक्स्ट, लिंक्स, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन्स आदी अटॅच करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात डे व्ह्यू देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही एकाच वेळी दोन कॅलेंडर मॅनेज करता येतील. तर एखाद्या बैठकीत उपस्थित असणार्यांची माहितीदेखील यात टाकण्याची सुविधा या ताज्या अपडेटमध्ये देण्यात आली आहे.