कूलपॅड कूल प्ले ६: १४,९९९ रूपयांत सहा जीबी रॅम आणि ड्युअल कॅमेरा !
By शेखर पाटील | Published: August 21, 2017 08:29 AM2017-08-21T08:29:53+5:302017-08-21T08:33:07+5:30
कुलपॅड कंपनीने अवघ्या १४,९९९ रूपयात तब्बल सहा जीबी रॅम आणि ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा कुलपॅड कुल प्ले ६ हा स्मार्टफोन सादर केला आहे.
आधी सहा जीबी रॅम ही बाब स्वप्नवत मानली जात होती. तथापि, अलीकडच्या काळात या प्रकारातील स्मार्टफोन बाजारपेठेत मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ लागले आहेत. यात सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या महागड्या मॉडेल्सपासून चिनी कंपन्यांनी २५ ते ४० हजार रूपयातील मॉडेल्सचा समावेश आहे. मात्र ढोबळ मानाने विचार करता भारतीय बाजारपेठेत सध्या तरी २० हजार रूपयांच्या आत सहा जीबी रॅम असणारा कोणताही स्मार्टफोन उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर कूलपॅड कूल प्ले ६ हे सहा जीबी रॅम असणारे मॉडेल अवघ्या १४,९९९ रूपये मूल्यात लाँच करून कूलपॅडने धमाल उडवून दिली आहे. प्रारंभी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. यानंतर दुबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा करण्यात आली. हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले असून ४ सप्टेंबर रोजी याचा पहिला सेल होणार आहे.
कूलपॅड कुल प्ले ६ या स्मार्टफोनमध्ये अतिशय गतिमान असा ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर देण्यात आला आहे. या मॉडेलची रॅम सहा जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. कूलपॅड कूल प्ले ६ या मॉडेलची दुसरी खासियत म्हणजे यात ड्युअल कॅमेर्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. यात बोके इफेक्टची सुविधा देण्यात आला आहे. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल.
उर्वरित फिचर्सचा विचार करता कुलपॅड कुल प्ले ६ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आले आहे. कूलपॅड कूल प्ले ६ या मॉडेलमध्ये ४०६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ती एकदा चार्ज केेल्यानंतर तब्बल ३०० तासांपर्यंतचा स्टँडबाय टाईम देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, युएसबी टाईप-सी आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
कूलपॅड कूल ६ या मॉडेलच्या मूल्याचा विचार करता हा स्मार्टफोन मध्यम किंमतपट्टा म्हणजेच मीड-रेंज या प्रकारातील आहे. या सेगमेंटमध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. यात आता कूलपॅड कूल ६ या मॉडेलची भर पडली आहे. अर्थात सहा जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज आणि याच्या जोडीला ड्युअल कॅमेरा सेटअप आणि जंबो बॅटरी या बाबी पाहता कूलपॅड कूल प्ले ६ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत धमाल उडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.