कुलपॅडचा ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: May 3, 2018 12:52 PM2018-05-03T12:52:56+5:302018-05-03T12:52:56+5:30
कुलपॅड कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्यांचा समावेश असणारा कुलपॅड नोट ६ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.
अलीकडच्या काळात अनेक स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला असतो. तर मोजक्या मॉडेल्समध्ये पुढील बाजूसही ही सुविधा दिलेली असते. या पार्श्वभूमिवर, कुलपॅड नोट ६ या मॉडेलमध्येही याच प्रकारचे म्हणजेच ड्युअल फ्रंट कॅमेर्यांचे फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांच्या दोन कॅमेर्यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून यांच्या मदतीने अतिशय सजीव वाटणार्या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासाठी १२० अंशाचा व्ह्यू देण्यात आल्यामुळे या प्रतिमा विस्तृत क्षेत्रातील असणार आहेत. एकंदरीत पाहता सेल्फी प्रेमींसाठी हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/२.२ अपार्चरयुक्त एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या प्रणालींनी सज्ज असणारा १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.
कुलपॅड नोट ६ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ३२ आणि ६४ जीबी असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये ४०७० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ३५० तासांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कुलपॅड नोट ६ या मॉडेलच्या ३२ जीबी व्हेरियंटचे मूल्य ८,९९० तर ६४ जीबी व्हेरियंटचे मूल्य ९,९९९ रूपये आहे. हे मॉडेल ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे.