Coronavirus: सॅमसंग इंडिया सरसावली; PM Cares आणि 'या' दोन राज्यांना मिळून २० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:52 PM2020-04-15T17:52:59+5:302020-04-15T17:53:30+5:30
आता मोबाइल, टेलिव्हिजन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर असलेल्या सॅमसंग इंडियानंही कोरोना विरोधातल्या लढाईत योगदान दिलं आहे.
नवी दिल्लीः कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं असून, या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात टाळेबंदी असल्यानं मोदींनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर्स फंडाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी पीएम केअर्स फंडाला मदतीचा हात दिलेला आहे. आता मोबाइल, टेलिव्हिजन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर असलेल्या सॅमसंग इंडियानंही कोरोना विरोधातल्या लढाईत योगदान दिलं आहे. सॅमसंग समूहानं कोरोनासाठी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि तामिळनाडू सरकारला २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाविरोधातील लढ्यात सॅमसंग इंडियानं केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडाला १५ कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलेले असून, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारला मिळून पाच कोटींची रक्कम देणार आहे. कंपनीनं एक निवेदनही प्रसिद्धीस दिलेलं असून, त्यात या मदतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या नोएडा प्रशासनाला सॅमसंगनं पाठिंबा दिलेला आहे. तसेच डिजिटल एक्स-रे, डिजिटल अल्ट्रासाऊंडचा पुरवठा करणार असल्याचं सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सॅमसंग इंडियाची कोरोना विरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली आहे, सॅमसंग विविध सरकारे, स्थानिक संस्था आणि आरोग्य सेवा यांच्यासोबत मिळून काम करत आहे. सॅमसंग कंपनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमार्फत दररोज गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी मदत करत आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्या त्यांची सेवा केंद्रे आणि ग्राहक कॉल सेंटर बंद असले तरी ते ऑनलाइन माध्यमांतून ग्राहकांशी जोडलेले राहतील.