सिस्टम क्रॅश टाळता आले असते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 12:21 PM2024-07-28T12:21:18+5:302024-07-28T12:21:44+5:30
आपल्या मोबाइल, संगणक, स्मार्ट वॉचेस वगैरे यंत्रांवर येणारे अपडेट करणे आवश्यक असते का..? अपडेट म्हणजे नक्की काय..? ते नाही केले तर काय फरक पडतो.. मायक्रोसॉफ्टमुळे झालेले हाल टाळता आले असते का? सविस्तर जाणून घेऊ...
सिद्धार्थ भगत, इलेक्ट्रॉनिक पुराव्यातील सायबर तज्ज्ञ
नुकताच मायक्रोसॉफ्टमुळे जो घोळ झाला, लोकांचे जे हाल झाले ते खरेच व्हायला हवे होते का? नेमके काय घडले याचा जरा विचार केला तर लक्षात आले की, मायक्रोसॉफ्ट तिच्याशी निगडित सॉफ्टवेअरमध्ये ऑटो-अपडेट होताना चुकीच्या सॉफ्टवेअर पॅचमुळे बहुतांश जगातील संगणक क्रॅश म्हणजेच बंद झाले व संगणकावर ब्लू स्क्रीन येऊन त्यात एरर मेसेज झळकू लागला. मग मुळात प्रश्न असा की, आपल्या मोबाइल, संगणक, स्मार्ट वॉचेस वगैरे यंत्रांवर येणारे अपडेट करणे आवश्यक असते का..? अपडेट म्हणजे नक्की काय..? ते नाही केले तर काय फरक पडतो..? आपण सविस्तर जाणून घेऊ..
अपडेट म्हणजे काय..?
जेव्हा पण सॉफ्टवेअरची ही कंपनी आपल्या ॲप अथवा सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करते तेव्हा ती पूर्ण सॉफ्टवेअर अन-इंस्टॉल न करता आणि डिव्हाइसमधील डेटा न घालवता, त्याच्या फंक्शनमध्ये बदल घडवून आणते. अगदी नुकतेच उदा. म्हणजे व्हॉट्सॲपने काही दिवसांपूर्वी ‘मेटा एआय’ आणले, जे ‘चॅट-जीपीटी’प्रमाणे कुठल्याही प्रश्नाला त्वरित उत्तर देते. हे तर वरवरचे उदाहरण झाले. बारीक-सारीक अथवा मोठमोठे बदल त्या ॲपचे मालक घडवून आणत असतात. काही वेळा त्या ॲपची सुरक्षेच्या दृष्टीने तर काही वेळा छोटे-मोठे वापरकर्त्याला एरर/बिघाड जाणवत असतात, ते ती कंपनी दुरुस्त करून सुधारित आवृत्ती फक्त ‘अपडेट’वर क्लिक करून क्षणात बिघाड दुरुस्त होऊ शकतो.
आता प्रश्न कितपत करणे आवश्यक आहे..?
वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला एखादी ॲपमध्ये एरर/ बिघाड जाणवला तर एखाद्या वेळेस अपडेट करणे फायद्याचे ठरते; पण बहुतांश वेळेला आपल्याला एरर वेगळाच असतो आणि त्यावर तोडगा कंपनी देऊ शकत नाही. याची दुसरी बाजू अशी की, विनाकारण ना एरर ना कुठली आवश्यकता आणि एखाद्या ॲप/ सॉफ्टवेअरवर आपले खूप काही काम अवलंबून असते. आपण ते तूर्तास टाळू शकतो. काम सोडून ॲप अपडेट करणे कठीण जाते. अपडेटलापण काही मिनिटे लागतात.
काही नुकसान होऊ शकते का..?
कधी-कधी अपडेट करताना डेटा डिलिट होण्याची शक्यता असते किंवा अपडेटने आपल्या डिव्हाइसमधील फंक्शन चालेनासे होऊ शकते. तेव्हा कोणाची मदत मिळणे खूप मोलाची ठरते. अशा संकटात कंपनी किंवा त्या ॲपची सेवा देणारे मदत करत नाही. उदा. वर्षानंतर डिव्हाइसची वॉरेंटी संपल्यावर, आपल्या डिव्हाइसमधील बिघाड बघण्यास नकार देते; पण अपडेट मात्र वॉरंटीसंपूनसुद्धा कित्येक वर्षे अपडेट मोफत देत असते. एका प्रसिद्ध कंपनीवर अपडेटनंतर बॅटरी क्षमता कमी झाल्याची तक्रार युरोपमधील न्यायालयात आरोप करण्यात आले व ते त्या कंपनीने मान्य करून नुकसानभरपाई देण्यास होकारपण दिला होता. आज घटना मोठी घडली म्हणून ही गोष्ट उघडकीस आली, एरवी अशा घटनांना कंपनीकडून दाद मिळत नाही.
जर ऑटो-अपडेट किंवा फोर्स अपडेट पर्याय वगळला असता.. तर १९ जुलैची घटना टाळता आली असती. नुकसान काही युजर्सपुरतेच मर्यादित राहिले असते. कुठल्याही कंपनीने युजरला ऐच्छिक पर्याय देणे आवश्यक आहे, ऑटो-अपडेट बंधनकारक नसावे. क्राउड-स्ट्राइक या अँटी-व्हायरस कंपनीला, ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे म्हणण्याची वेळ आली नसती.