काय सांगता! ड्रोन कॅमेरा मिळणार स्मार्टफोनमध्ये बिल्ट इन; विवो आणू शकते डिटॅचेबल फ्लायिंग कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: July 2, 2021 06:19 PM2021-07-02T18:19:49+5:302021-07-02T18:21:52+5:30
Vivo flying camera smartphone: Vivo कंपनी एक असा डिवाइस लाँच करू शकते जो उडणाऱ्या डिटॅचेबल कॅमेरा मॉड्यूलसह येईल.
विवो एका खास आणि अनोख्या स्मार्टफोन फिचरवर काम करत असल्याची माहिती एका पेटंटच्या माध्यमातून समोर आली आहे. हवेत उडणारे ड्रोन कॅमेरे तर सध्या उपलब्ध आहेत परंतु कंपनी एक असा डिवाइस लाँच करू शकते जो उडणाऱ्या डिटॅचेबल कॅमेरा मॉड्यूलसह येईल. (Vivo patent suggests flying selfie cameras could be the future)
LetsGoDigital ने आपल्या एका रिपोर्टमध्ये विवोच्या या अनोख्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे. चिनी कंपनी विवोने गेल्यावर्षी वर्ल्ड इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑर्गनायजेशन (WIPO) कडे हे पेटंट फाईल केले होते. हे पेटंट 1 जुलै 2021 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. पेटंटच्या फोटोज वरून असे दिसते कि हा एक आधुनिक स्मार्टफोन असेल. परंतु या डिवाइसच्या खालच्या भागातून एक डिटॅचेबल फ्लायिंग कॅमेरा बाहेर निघेल. थोडक्यात फ्लायिंग कॅमेरा वापरात नसताना डिवाइसमध्ये लपून राहील.
या डिटॅचेबल फ्लायिंग कॅमेऱ्यात, चार प्रोपेलर असतील जे या ड्रोनला उडण्यास मदत करतील. यात एक बॅटरी असेल आणि यावर दोन कॅमेरा सेन्सर्स देण्यात येतील. विशेष म्हणजे या फ्लायिंग कॅमेऱ्याच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना दोन इन्फ्रारेड सेन्सर्स देण्यात येतील. या सेन्सर्सचा वापर इतर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो परंतु यांचे मुख्य काम उडताना समोर येणारे अडथळे टाळणे हे असेल.
या फ्लायिंग कॅमेऱ्यात एक ऑटोमॅटिक फॉलो मोड असेल जो युजरला फॉलो करत आपोआप उडत राहण्यास मदत करेल. यात काही एयर जेस्चर सपोर्ट देखील असतील परंतु त्यांची सविस्तर माहिती पेटंटमध्ये देण्यात आली नाही. हा फ्लायिंग कॅमेरा एका स्मार्टफोनमध्ये येणार असल्यामुळे याचा आकार खूप छोटा असू शकतो. कंपनी या अनोख्या डिवाइसवर काम करत आहे कि नाही याची निश्चित अशी माहिती मिळाली नाही. आशा आहे कि लवकरच ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सत्यात येईल.