आता वापरा एक सीम?; मोबाइल कंपन्यांची वेगळीच स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:18 PM2018-11-23T12:18:34+5:302018-11-23T13:08:43+5:30
दूरसंचार इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांच्यामते, एअरटेल आणि आयडिया कंपन्यांनी जिओला टक्कर देताना अनेक नवनवीन प्लॅन बाजारात आणले.
नवी दिल्ली - स्मार्टफोन युजर्संसाठी दोन सीम, विशेषत: वेगवेगळ्या कंपनीचे दोन सीम वापरणे हा ट्रेंड बनला आहे. मात्र, लवकरच केवळ एकाच कंपनीचे सीमकार्ड बाजारात उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहकांकडे असलेल्या सीमकार्डमध्ये तब्बल 6 कोटींनी घट होण्याची शक्यता आहे. कारण, जवळपास सर्वच कंपन्यांकडून एकसारख्या सेवा दिल्या जातात. त्यामुळे एकाच कंपनीचे सीम देण्याबाबत सध्या विचार सुरु आहे. या निर्णयामुळे ग्राहकांनाही फायदा होईल, असे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.
दूरसंचार इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांच्यामते, एअरटेल आणि आयडिया कंपन्यांनी जिओला टक्कर देताना अनेक नवनवीन प्लॅन बाजारात आणले. त्यामुळे ग्राहकांकडून या तीन कंपन्यांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. तर उर्वरीत इतर कंपन्यांची स्पर्धाच जणू बंद झाली आहे. तर, ग्राहकही एकाच सीम कार्डला प्राधान्य देत आहेत. सध्या देशात एकच कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्यांची संख्या 7.3 कोटी ते 7.5 कोटी एवढी आहे. देशात मोबाईल युजर्संची संख्या जवळपास 1.2 अब्जवर पोहचोल्याचे दिसून येते. उर्वरीत ग्राहक दोन सीम कार्डचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 'सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे संचालक (सीओएआय) राजन मॅथ्यू यांच्या मते आगामी सहा महिन्यांमध्ये मोबाइलधारकांच्या संख्येत 2.5 ते तीन कोटींची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'डेलॉइट इंडिया'च्या टेक्नॉलॉजी, मीडिया आणि टेलिकम्युनिकेशनचे संचालक हेमंत जोशी यांच्या मते अनेक सिम कार्डपेक्षा एकच सिम कार्डचा वापर होणे दूरसंचार उद्योगासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे कंपन्यांना खऱ्या अर्थाने ग्राहकांचा कल जाणता येणार असून, भविष्यातील डावपेच आणि सेवेचा विस्तार ठरविता येणार आहे.
रिचार्ज न करणाऱ्यांना 'दे धक्का'
नियमित रिचार्ज न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याचा निर्णय भारती एअरटेल आणि आयडिया कंपनीने नुकताच घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांकडून 28 दिवसांची मुदत असलेल्या 35 रुपये, 65 रुपये आणि 95 रुपयांच्या नव्या योजना सादर केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमांतून दोन्ही कंपन्यांनी रिलायन्स जिओफोन युजर्सच्या 49 रुपयांच्या योजनेला टक्कर देण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनाही कोणत्या तरी एकाच मोबाइल सेवा पुरवठादाराकडून सेवा घेणे क्रमप्राप्त होणार आहे.
आंतरराष्ट्रीय रोमिंग
रिलायन्स जिओकडून आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा पुरविण्यात येणार आहे. भारत आणि जपानमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा देण्यात येईल. त्यामुळे 'व्हीओएलटीई'वर आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सादर करणारी 'रिलायन्स जिओ' ही देशातील पहिलीच कंपनी ठरणार आहे.