गुगल सर्चमधून हटवा तुमची माहिती, वापरकर्त्यांना करता येणार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:40 AM2022-05-02T11:40:16+5:302022-05-02T11:40:38+5:30
नाव, पत्ता हटविणे होणार सोपे
एखादी गोष्ट माहीत नसेल किंवा माहिती करून घ्यायची असेल, तर हल्ली सर्रासपणे गुगल कर असे बोलले जाते. सोशल मीडियाच्या जगात गुगलला सर्वच गोष्टींची माहिती असते, असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीबाबत खासगी माहितीही गुगलवर सहजपणे उपलब्ध होते, पण आता तुम्ही तुमची खासगी माहिती गुगल सर्चवरून काढून टाकू शकता.
जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गुगलचे पॉलिसी हेड मिचेल चँग यांनी कंपनीच्या नवीन अद्ययावत धोरणाविषयी माहिती दिली.
कशी हटवाल खासगी माहिती?
खासगी किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी कंपनीने नवे धोरण आणले आहे. आता तुम्ही सर्च रिझल्टमधून तुमचे नाव, फोटो, मोबाइल नंबर, पत्ता किंवा ईमेल आयडी अशी खासगी माहिती हटविण्याची विनंती गुगलला करू शकता. त्यासाठी गुगलच्या हेल्पलाइन ईमेल आयडीवर मेल करावा लागेल.
गुगल करणार पुनरावलोकन
तुमच्याकडून खासगी माहिती हटविण्याचा मेल मिळाल्यानंतर गुगलकडून त्याचे पुनरावलोकन केले जाईल. यानंतर, वापरकर्त्याच्या विनंतीनुसार, त्याचे वैयक्तिक तपशील गुगल प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जातील. ज्या माहितीमुळे वापरकर्त्याची कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे, केवळ अशी माहिती काढली जाईल, असेही गुगलने स्पष्ट केले आहे, शिवाय सरकारी किंवा अधिकृत स्रोतांच्या साइटवरील सामग्री सार्वजनिक रेकॉर्डचा भाग आहे की नाही, याचेही पुनरावलोकन केले जाईल.