डिलीट केलेला व्हॉट्स ॲप मेसेज परत मिळणार; चॅट लिस्टमध्ये स्टेट्स दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:27 AM2022-08-23T07:27:50+5:302022-08-23T07:28:05+5:30
व्हॉट्स ॲप अनेक नवनवीन फिचर्सवर काम करत आहे. नवीन अहवालानुसार, व्हॉट्स ॲपमध्ये युजर्सना स्टेटस अपडेट्स चॅट लिस्टमध्येच दाखवले जातील.
नवी दिल्ली :
व्हॉट्स ॲप अनेक नवनवीन फिचर्सवर काम करत आहे. नवीन अहवालानुसार, व्हॉट्स ॲपमध्ये युजर्सना स्टेटस अपडेट्स चॅट लिस्टमध्येच दाखवले जातील. सध्या युजर्सना स्टेटस अपडेट्स पाहण्यासाठी वेगळ्या सेक्शनमध्ये जावे लागते. त्याच वेळी, दुसऱ्या फीचरमध्ये, वापरकर्त्यांना डिलीट केलेले संदेश रिकव्हर करण्याची संधीही मिळणार आहे.
व्हॉट्स ॲप वापरकर्ते आत्ता ॲप उघडतात तेव्हा त्यांना सर्वात अगोदर दिसते चॅट लिस्ट, जिथे एखाद्यासोबत शेअर केलेला शेवटचा मेसेज आणि मेसेज पाहिला की नाही याबाबतचे चिन्ह दाखवले जाते.
मेसेज वाचलेला असल्यास
स्टेटस निळ्या रंगाच्या टिकने दाखवले जाते. व्हॉट्स ॲपशी संबंधित बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या डब्ल्यूबेटाइन्फो संकेतस्थळानुसार, आता त्यामध्ये बदल होणार असून आता प्रोफाइल फोटोभोवती एक वर्तुळ देखील दिसेल.
डिलीट केलेला मेसेज कसा मिळेल?
एखाद्या यूजरने मेसेज डिलीट केला तर त्याला लगेच एक बार दिसेल ज्यामध्ये अनडूचा ऑप्शन क्लिक करून मेसेज पुन्हा मिळवू शकता. वेबसाइटनुसार, हा बार तेव्हाच उघडेल जेव्हा ॲपला कळेल की मेसेज डिलीट झाला आहे. डिलीट झालेला मेसेज पुन्हा प्राप्त करण्यासाठी यूजरकडे काही सेकंद असतील.
काय करावे लागेल?
तुम्हाला या फीचरची चाचणी करायची असल्यास, व्हॉट्स ॲप बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी लागेल आणि ॲप गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंटरनेटवरून नवीन बीटा एपीके देखील डाउनलोड करू शकता.
ऑनलाइन न येता व्हॉट्स ॲप चालवा
मेसेज व नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी फोन कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. आता फोनवर ऑनलाइन न येता लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून व्हॉट्स ॲप चालवता येणार. डेस्कटॉपवर व्हॉट्स ॲप चालवण्यासाठी फोन जवळ ठेवून कनेक्ट करावा लागत होता.