न्यायालयाचा ASUS कंपनीला मोठा झटका, भारतात झेनफोनच्या विक्रीवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:39 PM2019-06-06T14:39:04+5:302019-06-06T14:39:19+5:30
तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसला न्यायालयानं मोठा झटका दिला आहे.
नवी दिल्लीः तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसला न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं झेन आणि झेनफोन ट्रेडमार्कबरोबरच फोन आणि लॅपटॉपची विक्री थांबवली आहे. न्यायालयानं Zen आणि 'Zenfone' ट्रेडमार्क असलेल्या प्रचारावरही बंदी घातली आहे. टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आसुसवर ट्रेडमार्क Zenच्या वापरासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.
न्यायालयानं 28 मे 2019पासून 8 आठवड्यांपर्यंत Zen ब्रँडमध्ये फोन, टॅबलेट, अॅक्सेसरिजची विक्री थांबवली आहे. दुसरीकडे टेलिकेअर नेटवर्क कंपनी ट्रेड मार्क्स अॅक्ट 1999अंतर्गत झेन आणि झेन मोबाइल ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. या ट्रेडमार्कअंतर्गत कंपनी भारतात फीचर फोन आणि स्मार्टफोन विकण्याची तयारी करत आहे.
परंतु त्याचदरम्यान 2014मध्ये आसुसनं भारतात Zenfone ट्रेडमार्कसह स्मार्टफोन बाजारात उतरवले. आसुसनं Zen ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था असल्याचा आरोप टेलिकेअरनं केला आहे. तर आसुसनं यावर स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, झेनफोन सीरिजचं नाव प्राचीन झेन फिलॉसफीच्या आधारावर ठेवण्यात आला आहे.