डेल एक्सपीएस 13 लॅपटॉप बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: December 19, 2017 12:29 PM2017-12-19T12:29:41+5:302017-12-19T13:18:36+5:30
डेल कंपनीने भारतात आपले एक्सपीएस १३ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीत उपलब्ध करण्यात आले आहे.
डेल कंपनीने भारतात आपले एक्सपीएस १३ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीत उपलब्ध करण्यात आले आहे. डेल कंपनीने अलीकडेच एक्सपीएस १५ हे लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केले होते. आता याच मालिकेतील डेल १३ हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्यात आले असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ८४,५९० रूपयांपासून सुरू होणारे आहे.
हे मॉडेल कंपनीच्या संकेतस्थळासह डेलच्या देशभरातील शॉपीज, क्रोमा स्टोअर्स आणि रिलायन्स डिजीटलमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हे लॅपटॉप विंडोज १० प्रणालीवर चालणारे आहेत. यामध्ये इंटेलच्या आठव्या पिढीतील कोअर आय ५ व आय ७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. तर याच्या जोडीला इंटेलचे युएचडी ग्राफीक कार्डदेखील असेल. अर्थात यामुळे यावर गेमिंगचा मजादेखील घेता येणार आहे.
डेल एक्सपीएस १३ या लॅपटॉपमध्ये १३.३ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी क्षमतेच्या (१०८० बाय १९२० पिक्सल्स) इन्फिनिटी एज या प्रकारातील डिस्प्ले आहे. यात ब्लॅकलीट कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये मॅक्स ऑडिओ तंत्रज्ञानाने युक्त असणारे स्पीकर तसेच दोन दर्जेदार मायक्रोफोन आहेत. यात एचडी क्षमतेचा कॅमेरादेखील असेल. तर यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय तसेच यात एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी ३.१, थंडरबोल्ट ३ आणि ४ इन १ कार्ड रीडर देण्यात आले आहे.
डेल एक्सपीएस १३ हे लॅपटॉप विविध व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. यात ८ व १८ जीबी रॅमचे पर्याय आहेत. तर इनबिल्ट स्टोअरेजसाठी २५६ आणि ५१२ जीबी असे पर्याय देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये ६० वॅट क्षमतेची बॅटरी असून ती अतिशय उत्तम बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा लॅपटॉप घेणार्या ग्राहकाला मॅकअफी कंपनीची लिव्हसेफ या सेवेचे १२ महिन्यांचे सबस्क्रीप्शन मोफत देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.