युटिलिटी व्हेईकल आणि दुचाकींची मागणी वाढली; जून महिन्यात विक्रीमध्ये झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 12:49 AM2020-07-17T00:49:36+5:302020-07-17T00:51:07+5:30
देशातील मोटरसायकलींची विक्री मे महिन्यापेक्षा वाढली आहे. जून महिन्यात ७,०२,९७० दुचाकी विकल्या गेल्या. मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ३५.१९ टक्के कमी झाले आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून मंदीच्या विळख्यात सापडलेल्या वाहन उद्योगाला काहीसा दिलासा मिळू शकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जून महिन्यात देशातील दुचाकी तसेच युटिलिटी व्हेईकलची मागणी वाढली असून, त्यांच्या विक्रीतही आधीच्या महिन्यांपेक्षा वाढ झालेली दिसून आली आहे.
देशातील विविध वाहनांच्या जून महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार देशातील स्कूटरची विक्री २,६९,८११ अशी झाली आहे. मागील वर्षाच्या जून महिन्याशी तुलना करता ही विक्री ४७.३७ टक्क्यांनी कमी असली तरी मे महिन्यापेक्षा त्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
देशातील मोटरसायकलींची विक्री मे महिन्यापेक्षा वाढली आहे. जून महिन्यात ७,०२,९७० दुचाकी विकल्या गेल्या. मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ३५.१९ टक्के कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ४०,६२० मोपेडचीही विक्री जून महिन्यात झाली. याशिवाय ३० इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
जून महिन्यात देशातील ४६,२०१ युटीलिटी व्हेईकल्सची विक्रीही
जून महिन्यात झाली. ट्रकपेक्षा
लहान असलेली मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारी वाहने म्हणजे युटीलिटी व्हेईकल होत. मालवाहतूक व अन्य कामांना ही वाहने उपयुक्त
ठरत असल्यामुळे त्यांना सध्या
मागणी वाढत असल्याचे दिसून
आले आहे.
ही आहेत वाहनांची विक्री वाढण्याची कारणे
- मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापासून देशात असलेले लॉकडाऊन आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे बाजारातील आस्थापना सुरू झाल्या असून, उलाढालही वाढू लागली आहे. परिणामी वाहनांना मागणी वाढत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंदच आहे. आस्थापना व कारखाने सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने कामावर जाणे अनेकांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे स्वत:ची दुचाकी खरेदी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले आहे.
ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे तेथेही कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांचा स्वत:चे वाहन वापरण्याकडे कल आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यापेक्षा दुचाकी खरेदी करण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याने दुचाकींची विक्री वाढत आहे.