डिजिटल डिटॉक्स : तुमच्यावर पाळत ठेवणारे ‘ट्रोल फार्म्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:23 AM2021-08-19T07:23:31+5:302021-08-19T07:23:50+5:30

Troll Farms : आपली मते, आपल्या मतांचे पाठीराखे, आपले विरोधक या कशातच आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. एकुणात स्वातंत्र्याचा आभासच अधिक असतो.

Digital Detox: Troll Farms | डिजिटल डिटॉक्स : तुमच्यावर पाळत ठेवणारे ‘ट्रोल फार्म्स’

डिजिटल डिटॉक्स : तुमच्यावर पाळत ठेवणारे ‘ट्रोल फार्म्स’

Next

इंटरनेट किंवा व्हर्च्युअल जग हे पूर्णपणे स्वतंत्र आहे का? तिथे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य उपलब्ध असतं का? तर नाही! आपण जिथे मनमुराद बागडतो असे वाटते आणि जिथे आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते बोलता-लिहिता येते असे वाटते, तिथे तो सगळा निव्वळ आभास  असतो. आपली मते, आपल्या मतांचे पाठीराखे, आपले विरोधक या कशातच आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. एकुणात स्वातंत्र्याचा आभासच अधिक असतो.

आपण काय बघायचे, काय ऐकायचे, आपल्याला काय दिसले पाहिजे या सगळ्याचे निर्णय अनेकदा दुसरेच कुणीतरी घेत असते. संपूर्ण माहितीही अनेकदा मॅनिप्युलेट केली जाते, म्हणजे आपल्यापर्यंत काय, कसे पोचावे यात प्रचंड हस्तक्षेप  असतो.  हे सगळे मॅनिप्युलेट करण्यासाठी जगभर निरनिराळ्या स्तरांवर काम केले जाते. ट्रोल करण्यासाठी अगणित संगणकांसमोर अनेक ट्रोल्सना बसविले जाते. अनेकदा ही माणसे नसतातच. ते असतात ट्रोलिंग बॉटस्. एक विशिष्ट टार्गेट ठेवून माहितीची तोडफोड केली जाते, एखाद्यावर कमेंट‌्सच्या माध्यमातून हल्ला चढविला जातो. हे सगळे ठरवून केले जाते आणि हे ज्या संस्थांमधून केले जाते त्यांना म्हणतात ट्रोल फार्म्स.

फ्रीडम हाउसने (फ्रीडम ऑफ द नेट २०१७) ६० देशांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यापैकी २२ देश अशा ट्रोल फार्म्सचा वापर ऑनलाइन चर्चेवर परिणाम करण्यासाठी, त्या चर्चेला आपल्याला हवे ते वळण देण्यासाठी करतात असे दिसून आले आहे. हे देश बाहेरच्या एजन्सीचा वापर करतात म्हणजे काय तर एखाद्या स्थानिक चर्चेलाही अपेक्षित वळण देण्यासाठी ट्रोल फार्म्समध्ये बसलेल्या ट्रोलर्सना किंवा बॉट‌्सना कामाला लावतात. केम्ब्रिज अनॅलिटिकाच्या निमित्ताने हे आपण बघितलेच आहे. 
प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) मते, २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के वापरकर्त्यांनी ऑनलाइन ट्रोलिंग झाल्याचं मान्य केलं आहे. YouGov ने २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४५ टक्के प्रौढांनी ट्रोल हा शब्द ऐकला असल्याचे दिसून आले आहे. ट्रोल कुणीही असू शकतात. आपल्या ओळखीचे आणि अनोळखीही. 
ट्रोल्सपासून वाचायचे कसे?  त्याबद्दल बघूया पुढच्या भागात.

- मुक्ता चैतन्य

(समाज माध्यमाच्या अभ्यासक)

muktaachaitanya@gmail.com

Web Title: Digital Detox: Troll Farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.