डिश टिव्हीवर अमेझॉन अलेक्झाच्या ध्वनी आज्ञावलीची सुविधा

By शेखर पाटील | Published: August 9, 2018 03:19 PM2018-08-09T15:19:53+5:302018-08-09T15:21:58+5:30

डिश टिव्हीने आपल्या ग्राहकांसाठी अमेझॉन अलेक्झाच्या व्हाइस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलींचा सपोर्ट प्रदान करण्याची घोषणा केली आहे

DishTV Launches Amazon Alexa Skill to Lets Users Find Content Using Voice Commands | डिश टिव्हीवर अमेझॉन अलेक्झाच्या ध्वनी आज्ञावलीची सुविधा

डिश टिव्हीवर अमेझॉन अलेक्झाच्या ध्वनी आज्ञावलीची सुविधा

googlenewsNext

मुंबई: सध्या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. याच्या मदतीने कुणीही व्हाईस कमांडचा उपयोग करून विविध उपकरणांचा वापर करू शकतो. स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर, हेडफोन्स आदी विविध उपकरणांमध्ये या असिस्टंटला वापरले जात आहे. गुगल असिस्टंट, अमेझॉनचा अलेक्झा, अ‍ॅपलचा सिरी, सॅमसंगचा बिक्सबी आदी डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट जगभरात विपुल प्रमाणात वापरले जात आहेत. एकीकडे याला जगातील विविध भाषांचा सपोर्ट देऊन याची व्याप्ती वाढवली जात आहे. तर दुसरीकडे विविध क्षेत्रांमध्ये याचा वापर करण्यात येत आहे. या अनुषंगाने डिश टिव्ही या देशातील आघाडीच्या डीटीएच सेवेने आपल्या ग्राहकांसाठी अमेझॉन अलेक्झाच्या व्हाईस कमांडचा वापर करण्याची सुविधा जाहीर केली आहे.

ही सुविधा अलेक्झायुक्त उपकरणे उदा. इको मालिकेतील स्मार्ट स्पीकर्स अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅपच्या सहाय्याने वापरता येणार आहे. युजरला हव्या असणार्‍या उपकरणातून डिश टिव्हीला सपोर्ट मिळवण्यासाठी त्याला  सोप्या पध्दतीचा वापर करावा लागणार आहे. पहिल्यांदा त्याला संबंधीत उपकरणाच्या सेटअपमध्ये जाऊन डिश टिव्हीसाठी अलेक्झा कार्यान्वित करावे लागणार आहे. तसेच युजर अलेक्झा स्टोअरवरील डिश टिव्ही स्कील पेजवर जाऊनही याला कार्यान्वित करू शकतो. एकदा का ही प्रक्रिया पार पाडली की, मग कुणीही व्हाईस कमांडच्या मदतीने डिश टिव्हीचे कार्यक्रम पाहू शकतो. अर्थात युजरला त्याच्याकडे असणार्‍या रिमोट कंट्रोलची आवश्यकता भासणार नाही. याऐवजी तो त्याने सेट केलेल्या उपकरणाला (उदा. इको स्मार्ट स्पीकर अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅप) तोंडी आज्ञा देऊन चॅनल सर्फींग करू शकतो. याच्या अंतर्गत कुणीही आपल्याला हवे असणारे चॅनेल लाऊ शकतो. याशिवाय, तो एखाद्या कार्यक्रमाचे शेड्युल लाऊ शकतो. तो डिश टिव्हीच्या विविध विभागांमध्ये असणार्‍या कंटेंटचा शोध घेऊ शकतो. तो आपल्या रिचार्ज अथवा बॅलन्सबाबत माहिती मिळवू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो डिश टिव्हीच्या हेल्पलाईनशी संपर्कदेखील साधू शकतो. देशभरातील ग्राहकांसाठी हा सपोर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: DishTV Launches Amazon Alexa Skill to Lets Users Find Content Using Voice Commands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.