DoT ची सायबर गुन्ह्यांवर कारवाई; 35 हजार WhatsApp नंबर अन् हजारो ग्रुप्सवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:29 IST2025-01-13T16:29:19+5:302025-01-13T16:29:48+5:30
गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या सायबर गुन्ह्यांवर दूरसंचार विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

DoT ची सायबर गुन्ह्यांवर कारवाई; 35 हजार WhatsApp नंबर अन् हजारो ग्रुप्सवर बंदी
DoT Action : दूरसंचार विभागाने सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई केली आहे. DoT ने 35 हजार व्हॉट्सॲप अकाउंट्सवर बंदी घातली आहे. याशिवाय 70 हजारांहून अधिक व्हॉट्सॲप ग्रुप आणि कम्युनिटीजवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही दूरसंचार विभागाने मोठी कारवाई करत लाखो बनावट एसएमएस टेम्पलेट ब्लॉक केले होते. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या सायबर गुन्ह्यांवर दूरसंचार विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या काळात लाखो व्हॉट्सॲप अकाउंट्सवर बंदी घालण्याचे काम करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर दूरसंचार विभाग आणि ट्रायने त्यांच्या अनेक धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक
दूरसंचार विभागाने सांगितल्यानुसार, 73789 व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि कम्युनिटीजवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, दूरसंचार विभागाने जागरूक नागरिकांचे कौतुक केले असून, तुमच्या रिपोर्टिंगमुळे मोठा फरक पडू शकतो, असे सांगितले. तुम्हालाही फसवणुकीचा संशय असल्यास, सरकारी पोर्टल Chakshu (sancharsaathi.gov.in) वर त्वरित तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले.
Vigilant Citizens x Department of Telecom = Action Taken!
— DoT India (@DoT_India) January 10, 2025
👉 34,951 Accounts Blocked
👉 73,789 WhatsApp Groups & Communities Banned
Your report makes a difference.
Spot fraud? Report it to Chakshu on https://t.co/6oGJ6NTnZTpic.twitter.com/U8S1Qf7HW0
दरम्यान, सरकारने हे पोर्टल 2023 मध्ये लॉन्च केले होते. दूरसंचार विभागाच्या संचार साथी पोर्टलवर फसवणुकीच्या घटना ऑनलाइन नोंदवल्या जाऊ शकतात. याशिवाय कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेले कॉल किंवा मेसेज कळवण्याची सुविधाही आहे. दूरसंचार नियामक TRAI ने नुकतेच सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना बनावट कॉल्स बंद करण्यात असमर्थता दर्शवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लाखो सिम बंद करण्यात आले
गेल्या वर्षी सरकारने सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत 78.33 लाख मोबाईल क्रमांक बंद करण्याचे आदेश दिले होते. हे मोबाईल क्रमांक बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांना देण्यात आले होते. दूरसंचार विभागाने लागू केलेल्या नवीन एआय टूल्सच्या मदतीने हे बनावट क्रमांक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एवढंच नाही, तर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले 6.78 लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्याचा आदेशही सरकारने जारी केला होता.