मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरची दुप्पट वेगवान सुपरफास्ट आवृत्ती
By शेखर पाटील | Published: September 27, 2017 03:13 PM2017-09-27T15:13:41+5:302017-09-27T15:15:52+5:30
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टद्वारे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे फॉयरफॉक्स ब्राऊजरच्या ५६व्या आवृत्तीपासूनच फ्लॅश या अॅनिमेशन सॉफ्टवेअरचा सपोर्ट काढण्यात आला असल्याने या आवृत्तीतही फ्लॅश ब्लॉक करण्यात आले आहे. मोझिलाने याबाबत आधीच घोषणा केली होती. फ्लॅशमध्ये सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्यामुळे याचा सपोर्ट काढण्यात आला आहे. यामुळे फायरफॉक्स ब्राऊजरच्या या आवृत्तीत फ्लॅशवर आधारित अॅनिमेशन वा अन्य फाईल्स दिसणार नाहीत.
फायरफॉक्स ब्राऊजरच्या या आवृत्तीला मोझिलाने फायरफॉक्स क्वाँटम हे नाव दिले आहे. मोझिलाने गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रोजेक्ट क्वाँटमची घोषणा केली होती. यानुसार हे ब्राऊजर सादर करण्यात आले आहे. फायरफॉक्स ब्राऊजरची ही नवीन आवृत्ती आधीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी गतीमान असल्याचा मोझिलाचा दावा आहे. याशिवाय क्रोमए मायक्रोसॉफ्ट एज, सफारी आणि अन्य ब्राऊजरपेक्षाही हे अधिक गतीमान आणि कार्यक्षम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे ब्राऊजर मोझिलाच्या प्रोजेक्ट फोटॉनवर आधारित आहे. अर्थात याचे डिझाईन यानुसार करण्यात आले आहे. यात सुटसुटीत चौरसाकृती टॅब देण्यात आल्या आहेत. तर बुकमार्क, हिस्टरी, स्क्रीनशॉट, डाऊनलोड आदींसाठी यात क्विक अॅक्सेस प्रदान करण्यात आला आहे. याचा इंटरफेस अतिशय सुलभ असून तो विंडोज १०, अँड्रॉइड ओरिओ, आयओएस ११ आणि मॅकओएस हाय सिएरा या सर्व प्रणालींवर समान पध्दतीने वापरता येतो. अर्थात संगणक, लॅपटॉप, टॅबलेटसह स्मार्टफोनवर फायरफॉक्स ब्राऊजर आता सुपरफास्ट गतीने वापरता येणार आहे.
फायरफॉक्स ब्राऊजरच्या या नवीन आवृत्तीमध्ये मोझिलाने गेल्या वर्षी अधिग्रहीत केलेले पॉकेट हे अॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही एका स्वतंत्र विभागात बुकमार्क केलेले वेब पेजेस ऑफलाईन पध्दतीत वाचू शकतो. याशिवाय यात अन्य युजर्सच्या रेकमेंडेशननुसार प्रत्येक युजरला कंटेंट सजेस्ट केले जाणार आहे. ही नवीन आवृत्ती सर्व युजर्सला १४ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. तथापि, जगभरातील युजर्ससाठी याची प्रयोगात्मक (बीटा) आवृत्ती आता सादर करण्यात आली आहे. याचा कुणीही वापर करू शकतो.