आधी नंबरऐवजी युझरनेम सेट करण्याचा पर्याय, आता व्हॉट्सॲपवर करता येणार ‘स्क्रीन शेअरिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:52 AM2023-05-29T11:52:43+5:302023-05-29T11:53:01+5:30
वापरकर्त्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी साेशल मेसेजिंग ॲप ‘व्हाॅट्सॲप’ सातत्याने नवे प्रयाेग करीत आहे.
वापरकर्त्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी साेशल मेसेजिंग ॲप ‘व्हाॅट्सॲप’ सातत्याने नवे प्रयाेग करीत आहे. व्हाॅट्सॲपने नुकतेच माेबाइल क्रमांकाऐवजी युझर नेम सेट करण्याचा पर्याय देण्याची चाचणी सुरू केली आहे. आता आणखी एक नवे फीचर देण्याची तयारी सुरू केली आहे. वापरकर्त्यांना व्हिडीओ काॅलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचा पर्याय लवकरच मिळणार आहे. त्याची बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे.
ही गाेष्ट असू द्या ध्यानात
स्क्रीन शेअरिंगचा पर्याय वापरताना वापरकर्ते जी माहिती शेअर करतील, ती व्हाॅट्सॲपदेखील ॲक्सेस करू शकेल. त्यात पासवर्ड, पेमेंट डिटेल, फाेटाे, मेसेज तसेच ऑडिओचा समावेश आहे. म्हणजेच हा पर्याय वापरताना व्हिडीओ काॅलिंग एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड राहणार नाही. तसा इशारा देणारा संदेश स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यापूर्वीच दिसेल.
नवे फीचर अँड्राॅइडवरच
नवे फीचर सध्या अँड्राॅइडवरच मिळणार आहे. व्हाॅट्सॲप बीटा व्हर्जन २.२३.११.१९ मध्ये या फिचरची चाचणी करण्यात येत आहे. सध्या काही निवडक लाेकांनाच हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप कदाचित जुन्या अँड्राॅइड फाेनवर चालणार नाही. जास्त लाेक सहभागी झाल्यास नवे फीचर व्हिडीओ काॅल्सवर चालणार नाही.
कसे वापरणार नवे फीचर?
वापरकर्त्यांना व्हिडीओ काॅलदरम्यान कॅमेरा स्विच पर्यायाच्या बाजूला मिळेल. स्क्रीन शेअरिंगच्या परवानगीनंतरच हा पर्याय उपलब्ध हाेईल.
पर्यायावर टॅप केल्यानंतर एक इशारा देणारा संदेश स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर ‘स्टार्ट नाऊ’ यावर टॅप केल्यानंतर स्क्रीन शेअरिंग सुरू हाेईल.
वापरकर्त्यांना काेणत्याही क्षणी स्क्रीन शेअरिंग थांबविता येईल.