आता अंतराळातून काढा तुमच्या घराचे फोटो; फक्त करावे लागेल हे काम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:53 PM2024-07-09T18:53:32+5:302024-07-09T18:53:59+5:30
बंगळुरुतील एका कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.
Earths Satellite Image :पृथ्वीचे अंतराळातून काढलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण, अंतराळातून तुमचे घर कसे दिसते, हे कधी पाहिले आहे का? अंतराळातून घराचा फोटो कसा काढता येईल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण, आता हे शक्य आहे. एका कंपनीने ही अनोखी सेवा सुरू केली आहे. फक्त यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील.
फोटो कोण काढणार?
बंगळुरुतील स्टार्टअप कंपनी Pixel ने हे काम सुरू केले आहे. Pixel एक ऑनलाइन सॉफ्टवेअर आणणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची सॅटेलाइट इमेज पाहू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील. कंपनीचे सह-संस्थापक अवैस अहमद सांगतात की, सर्वसामान्यांना आपल्या घराचे सॅटेलाइट इमेज कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सेवा कधी सुरू होणार?
ही सेवा वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते. Pixel चे पृथ्वी निरीक्षण सॉफ्टवेअर अरोरा उपग्रहावरुन घेतलेल्या पृथ्वीच्या हायपरस्पेक्ट्रल प्रतिमा दाखवू शकतो. याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तुमच्या घराचे फोटो काढू शकता. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहत असाल, तरी तुम्ही आपल्या घराची सॅटेलाइट इमेज पाहू शकता.