इलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटरवरील पोस्ट वाचण्यावर मर्यादा; जाणून घ्या नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:00 PM2023-07-02T13:00:34+5:302023-07-02T13:01:32+5:30
twitter new rules 2023 : इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली असून ट्विटर युजर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
Twitter New Rules : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मस्क यांनी अनेकदा वेगवेगळे नियम लागू करून ट्विटरला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले. अशातच शनिवारी त्यांनी एक मोठी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता ट्विटरवर एका दिवसात वाचल्या जाणाऱ्या पोस्टवर तात्पुरत्या (Twitter Temporary Limit) मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनचा सामना करण्यासाठी आम्ही या तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. सत्यापित खाती असलेले युजर्स (Verified accounts) एका दिवसात ६ हजार पोस्ट वाचू शकतात. तसेच असत्यापित खाती (Unverified accounts) असलेल्या युजर्संना दररोज ६०० पोस्ट वाचता येणार आहेत. याशिवाय नवीन असत्यापित खाती असलेल्या युजर्संना दिवसाला ३०० पोस्ट वाचता येणार आहेत. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचेही मस्क यांनी स्पष्ट केले.
To address extreme levels of data scraping & system manipulation, we’ve applied the following temporary limits:
— Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
- Verified accounts are limited to reading 6000 posts/day
- Unverified accounts to 600 posts/day
- New unverified accounts to 300/day
दुसर्या ट्विटमध्ये मस्क म्हणाले की, सत्यापित खात्यांची मर्यादा लवकरच ८००० एवढी वाढवणार आहोत. तर असत्यापित खात्यांना दिवसाला ८०० आणि नवीन असत्यापित खात्यांना दिवसाला ४०० पोस्ट वाचता येणार आहेत.
Rate limits increasing soon to 8000 for verified, 800 for unverified & 400 for new unverified https://t.co/fuRcJLifTn
— Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
दरम्यान, डेटा स्क्रॅपिंगमुळे ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी हा दुसरा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ट्विटरवरील पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटरवरील पोस्ट अथवा मजकूर वाचता येणार नाही.