Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 02:34 PM2023-07-13T14:34:43+5:302023-07-13T14:35:39+5:30
जगाची वास्तविकता समजून घेण्यासाठी इलॉन मस्क यांनी xAI नावाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली आहे.
Elon Musk xAI: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी बुधवारी ChatGPT निर्माण करणाऱ्या OpenAI शी स्पर्धा करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. इलॉन मस्क यांनी ChatGPT वर राजकीय पक्षपाती आणि बेजबाबदार असल्याचा आरोप केला आहे. xAI वेबसाइटनुसार, इलॉन मस्क xAI कंपनीला त्यांच्या इतर व्यवसायांपासून वेगळे ठेवतील, परंतु या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा Twitter सह त्यांच्या इतर सर्व व्यवसायांना फायदा होणार आहे. वेबसाइटनुसार, xAI चा उद्देश या जगाचे खरे स्वरूप समजून घेणे आहे.
Announcing formation of @xAI to understand reality
— Elon Musk (@elonmusk) July 12, 2023
इलॉन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले की, नवीन कंपनीचा उद्देश जगाची वास्तविकता समजून घेणे आणि जीवनासमोरील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आहे. या स्टार्टअपमध्ये OpenAI, Google DeepMind, Tesla आणि टोरंटो विद्यापीठातील माजी संशोधकांचा समावेश आहे. या टीमचे सल्लागार डॅन हेंड्रिक्स असतील, जे सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील AI सेफ्टी सेंटरचे प्रमुख आहेत. सेंटर फॉर AI सेफ्टीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित करण्याविरोधातही इशारा दिला आहे.
Ai मानवाच्या अस्तित्वाला धोका
हेंड्रिक्स यांनी जूनमध्ये जागतिक नेत्यांना एक खुले पत्र लिहून इशारा दिला होता की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवी अस्तित्वासाठी एखादी महामारी किंवा आण्विक युद्धाइतकीच धोकादायक आहे. इलॉन मस्क यांनीदेखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी संबंधित धोक्यांबद्दल वारंवार इशारा दिला आहे आणि त्याला आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका म्हटले आहे. या दिशेने वेगाने वाटचाल करणे म्हणजे 'आ बैल मुझे मार' असे त्यांचे म्हणणे आहे.
मस्क यांनी केली OpenAI ची सुरुवात
विशेष म्हणजे, 2015 मध्ये इलॉन मस्क OpenAI चे सह-संस्थापक होते. त्यांनी Google द्वारे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या क्षेत्रात अतिशय वेगाने होणाऱ्या कामावरही अनेकदा भाष्य केले आहे. पण, Tesla वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी 2018 मध्ये OpenAI सोडले. असेही सांगितले जाते की, कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांनी नफा मिळविण्यासाठी घेतलेल्या काही निर्णयांमुळे मस्क अस्वस्थ होते.