"इलॉन मस्क खुर्ची सोडा", युजर्सचा कौल; ट्विटरवर ५७% लोक म्हणाले 'हो', आता पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:41 AM2022-12-20T11:41:07+5:302022-12-20T11:42:29+5:30
१९ डिसेंबर रोजी पहाटे ४.५० वा. मस्क यांनी हा पोल ट्विटरवर टाकला. लोकांचा जो कौल येईल, त्याचे मी पालन करीन, असेही मस्क यांनी त्यात म्हटले आहे.
सॅन फ्रॅन्सिस्को - ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का’, अशी विचारणा करणारा एक पोल इलॉन मस्क यांनी ट्विटरवर टाकल्याने सनसनाटी निर्माण झाली आहे. त्यावर ५७ टक्के युजर्सनी ‘हो’, असा कौल दिला आहे. त्यामुळे मस्क हे ट्विटरचे सीईओपद खरोखर सोडणार का, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.
१९ डिसेंबर रोजी पहाटे ४.५० वा. मस्क यांनी हा पोल ट्विटरवर टाकला. लोकांचा जो कौल येईल, त्याचे मी पालन करीन, असेही मस्क यांनी त्यात म्हटले आहे. या ट्विटला सुमारे १ लाख ३० हजारपेक्षा अधिक लोकांनी रिट्वीट केले, तसेच एक कोटी ७५ लाखपेक्षा अधिक लोकांनी पोलमध्ये भाग घेतला. मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा, या बाजूने ५७.५ टक्के लोकांनी मत टाकले आहे. ४२.५ टक्के लोकांनी राजीनाम्याच्या विरोधात मत दिले आहे.
मस्क यांनी आतापर्यंत अनेक निर्णय ट्विटर पोलद्वारे घेतले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही खाते अशाच जनमतानंतर बहाल करण्यात आले होते. काही पत्रकारांच्या खात्यांबाबतही अशाच प्रकारे निर्णय घेण्यात आला होता. आता मस्क काय निर्णय घेतात, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रमोशन नाही
- ट्विटरवर दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रमोशन करणार नाही. संबंधित ट्विटर हॅंडल ब्लॉक करण्यात येणार, असे नुकतेच जाहीर केले होते.
- अशा खात्यांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, मास्टोडन, टूथ, इत्यादींचा समावेश आहे.
- भारतात ‘देशी ट्विटर’ म्हणून परिचित असलेला मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’चे ट्विटर खाते निलंबित करण्यात आले आहे. ‘कूमायनन्स’ नावाने हे खाते ट्विटरवर कार्यरत होते.