दुर्गम भागात देखील वापरता येणार वेगवान वायफाय; Elon Musk ची Starlink सर्व्हिस भारतात येण्याच्या मार्गावर
By सिद्धेश जाधव | Published: September 7, 2021 01:09 PM2021-09-07T13:09:36+5:302021-09-07T13:09:55+5:30
Starlink India Booking: एलॉन मस्क यांची स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा रेग्युलेटर अप्रूव्हलनंतर भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. ही एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे.
स्पेस-एक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सॅटेलाईट ब्रॉडबँड सर्व्हिसच्या भारतीय लाँचचे संकेत दिले होते. स्पेस-एक्सने स्टारलिंक नावाची सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा जागतिक बाजारात सादर केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटर युजर ट्रायोनसेटने मस्क यांना भारतात स्टारलिंक सेवा कधी सुरु होणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना स्पेस-एक्सच्या सीईओनी आपण रेग्युलेटर अप्रूव्हलची वाट बघत आहोत असे म्हटले आहे. (Starlink price in India is yet to annouce)
एलॉन मस्क यांची स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा रेग्युलेटर अप्रूव्हलनंतर भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. ही एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. त्यामुळे कंपनीच्या सॅटेलाईट डिशच्या मदतीने कुठूनही वेगवान इंटरनेट वापरता येईल. ही स्टारलिंक सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा भारतात दाखल झाल्यास जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडिया तसेच इतर ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात.
Our satellites launching in next few months have inter-satellite laser links, so no local downlink needed. Probably active in 4 to 6 months.
— Elon Musk (@elonmusk) September 1, 2021
StarLink कंपनीची सॅटेलाइट हाय-स्पीड इंटरनेट सर्विस सध्या बीटा स्टेजवर आहे. त्यामुळे युजर्स इंटरनेटचा स्पीड कमी असल्याची अनेकदा तक्रार करत असतात. यासाठी कंपनी पुढील काही महिन्यात लाँच होणाऱ्या सॅटेलाइट्समध्ये इंटर- सॅटेलाइट लेजर लिंक टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे, असे एलॉन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले आहे. कंपनी जवळपास 30,000 स्टारलिंक सॅटेलाइट्स अवकाशात सोडणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश्य सॅटेलाइट्स ग्रुपच्या माध्यमातून ग्लोबल ब्रॉडबँड कनेक्टिविटी देण्याचा आहे.