ट्विटर वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:44 AM2022-05-04T08:44:34+5:302022-05-04T08:48:48+5:30
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. यातच त्यांच्या एका ट्विटनं आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या काळात ट्विटरचा फुकटात वापर करता येणार नाही. त्यासाठी काही शुल्क भरावं लागणार आहे, असे संकेत इलॉन मस्क यांनी दिले आहेत. दरम्यान, सर्वसामान्य युझर्ससाठी ट्विटर मोफतच वापरता येणार आहे.
"सर्वसामान्य यूझर्ससाठी ट्विटर नेहमीच फ्री राहील. पण व्यावसायिक आणि सरकारी यूझर्ससाठी ट्विटर वापरण्यासाठी काही शुल्क द्यावं लागू शकतं", असं ट्विट इलॉन मस्क यांनी केलं आहे.
Twitter will always be free for casual users, but maybe a slight cost for commercial/government users
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022
मेट गालामध्ये इलॉन मस्क यांची उपस्थिती
इलॉन मस्क यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमधील मेट गालामध्ये उपस्थिती लावली. यादरम्यान, ते म्हणाले की ट्विटरच्या यशाची एक महत्त्वाची पायरी म्हणजे ते आपल्या वापरकर्त्यांचा लक्षणीय विस्तार करू शकतील. इतकंच नव्हे तर अमेरिकेच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग ट्विटरवर असावा आणि संवाद साधावा, अशी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले.
ट्विटरच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत जवळपास ट्विटरचे ४ कोटी डेली अॅक्टीव्ह यूझर्स आहेत. अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी ट्विटरचा वापर करावा अशी त्यांची इच्छा आहे.
ट्विटरमध्ये मोठे बदल करण्याचा मस्क यांचा विचार
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी तब्बल ४४ अब्ज डॉलरची डील केली आहे. यानंतर इलॉन मस्क आता कंपनीमध्ये अमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गाड्डे यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
ट्विटर खरेदी केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही पद्धतीमध्ये खूप महत्वाचं आहे असं वक्तव्य मस्क यांनी केलं होतं. ट्विटर एक डिजिटल टाऊन स्वेअर असून इथं मानवता आणि भविष्यावर चर्चा होत असते. त्यामुळे इथं प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, असं मस्क म्हणाले होते. तसंच ट्विटवर आणखी नवे फिचर्स आणण्याचीही इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.