Twitter मधून ६ महिन्यांच्या गर्भवती महिलेला काढलं, तिनं घेतली शपथ; म्हणाली...आता थेट कोर्टातच भेटू!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:42 PM2022-11-09T12:42:08+5:302022-11-09T12:43:45+5:30
ट्विटरमध्ये ऑपरेशन क्लीन हाती घेतलेल्या बॉस इलॉन मस्क यांना आता पुन्हा एकदा कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत.
नवी दिल्ली-
ट्विटरमध्ये ऑपरेशन क्लीन हाती घेतलेल्या बॉस इलॉन मस्क यांना आता पुन्हा एकदा कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत. कारण ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर मस्क यांनी कंपनीतून तडकाफडकी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा सपाटाच लावला आहे. आता याविरोधात कर्मचारी थेट कोर्टाची पायरी चढण्यासाठी तयार झाले आहेत. नुकतंच कंपनीच्या गर्भवती कर्मचाऱ्याला ती सहा महिन्यांची गर्भवती असताना अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्यानं तिनं आता मस्क यांच्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. नोकरी गेल्यानंतर शेनन लू या कर्मचारी महिलेनं See You In Court! (आता कोर्टात भेटू) असं ट्विट केलं होतं. सध्या हे ट्विट कंपनीकडूनच डिलीट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
ट्विटरच्या मालकी हक्कांची डील फायनल होताच मस्क यांनी कंपनीत मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. पण हेच निर्णय आता मस्क यांना संकटात आणणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळताच सर्वातआधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं.
कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्या शेनन लू यांनी घेतली शपथ
इलॉन मस्क यांनी ट्विटरमधील एकूण कर्मचारी संख्येपैकी जवळपास अर्धे कर्मचारी घरी बसवले आहेत. सध्या कंपनीत ३७०० कर्मचारी काम करत आहेत. कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्यांमध्ये एका सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या महिला कर्मचाऱ्याचं नाव शेनन लू असं आहे. आपली नोकरी गेल्याचं शेनन लू यांना कळताच त्यांनी संतापाच्या भरात ट्विटरच्या नव्या मालकांना थेट कोर्टात खेचण्याची धमकीच ट्विटरवर देऊन टाकली. ट्विटरमध्ये डेटा सायन्स मॅनेजर पदावर त्या कार्यरत होत्या. आता नोकरीवरुन काढून टाकलं गेल्यामुळे शेनन लू यांनी मस्क यांना कोर्टात खेचणार असल्याची शपथ घेतली आहे.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, याआधी मेटा कंपनीत कामाचा अनुभव असलेल्या शेनन लू यांनी जानेवारी २०२२ मध्ये ट्विटरमध्ये एन्ट्री केली होती. आता नोकरी गेल्यानंतर त्यांनी ट्विटरविरोधात केलेले ट्विट्स सध्या त्यांच्या वॉलवरुन हटवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या ट्विटर आणि मस्क यांच्याविरोधात कोर्टात जाणार की नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती कळू शकलेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी केल्याचं सांगण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, शेनन यांनी केलेले ट्विट खूप महत्वाचे आहेत. "माझा ट्विटरमधला प्रवास अशा क्षणी संपुष्टात आला आहे की मी सहा महिन्यांची गर्भवती आहे. तुम्हा सगळ्यांसोबत काम करताना मला आनंद मिळाला. कंपनीत डेटा सायन्सच्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. हा प्रवास खरंच आनंददायी होता", असं ट्विट शेनन यांनी केलं होतं. त्यानंतर एका ट्विटमध्ये शेनन यांनी कंपनीतील भेदभावाचंही वास्तव मांडलं. "कंपनीत निश्चित स्वरुपात भेदभावाचं वातावरण आहे. तर मी त्याविरोधात नक्कीच लढा देईन. माझी कामगिरी गेल्या तीन महिन्यांपासून चांगली होती आणि वास्तवाची मला पूर्णपणे जाणीव आहे की माझ्या तुलनेत पुरुष मॅनेजर्सना देखील माझ्या इतकं रेटिंग मिळालेलं नाही. आता तुम्हाला कोर्टातच पाहू", असं शेनन यांनी ट्विट केलं होतं.