ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:31 PM2022-11-04T15:31:52+5:302022-11-04T15:32:54+5:30
ट्विटरचा मालकी हक्क प्राप्त केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या वर्क फ्रॉम एनेवेअर म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची योजना बंद करण्याचा विचार केला आहे.
नवी दिल्ली-
ट्विटरचा मालकी हक्क प्राप्त केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या वर्क फ्रॉम एनेवेअर म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची योजना बंद करण्याचा विचार केला आहे. जेणेकरुन सर्व कर्मचाऱ्यांना आता पुन्हा ऑफीसला बोलावता येईल. जर असं घडलं तर टेस्ला प्रमाणेच आता ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम ऑफीस करणं बंधनकारक असणार आहे. इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचेही मस्क हे मालक आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सोशल मीडिया कंपनीच्या काही निर्णयांमध्ये काही अपवाद देखील असू शकतात. निवडक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होन करण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकतो. ट्विटरचे नवे मालक सोशल मीडिया कंपनीच्या वर्कफोर्सला थेट अर्ध्यावर आणू इच्छितात. जेणेकरुन ऑपरेशन कॉस्ट कमी करता येईल. कंपनीत अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत हे याआधीच कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. ट्विटरमध्ये ७ हजाराहून अधिक लोक काम करतात. यात अर्ध्याहून अधिकांची नोकरी जाणार आहे.
Work From Anywhere पॉलिसी लवकरच बंद होणार
इलॉन मस्क आणि त्यांच्या टीममधील सल्लागारांनी कर्मचारी कपात तसेच इतर नियमांमध्ये बदल करण्याबाबत नुकतीच चर्चा केली आहे. अद्याप Work From Anywhere पॉलिसी नेमकी केव्हापासून बंद होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण येत्या काही आठवड्यात याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. कारण मस्क यांनी कंपनीतील सर्व टीम्ससाठी डेडलाइन निश्चित केली आहे.
जूनमध्ये टेस्लानं सर्व कर्मचाऱ्यांना Work From Office बंधनकारक केलं आहे. कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला एकूण मिळून ४० तास भरावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीची Work From Anywhere पॉलिसी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी सुरूच ठेवली होती. पण मस्क यांनी कंपनी टेकओव्हर केल्यानंतर पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
टॉप अधिकाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
इलॉन मस्क यांनी ट्विटरचं अधिग्रहण केल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि पॉलिसी चीफ विजय गड्डे यांना नोकरीवरुन काढून टाकलं. ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार मस्क यांनी चीफ मार्केटिंग ऑफीसर लेस्ली बर्लेंड, चीफ कस्टमर ऑफिसर सराह परसोनेट आणि जीन फिलिप माहेयू यांनीही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.