Facebook Server फेलमुळे कर्मचाऱ्यांची ॲक्सेस कार्डही बंद, लॉक तोडून गेले सर्व्हर रूममध्ये; समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 09:17 AM2021-10-05T09:17:10+5:302021-10-05T09:22:00+5:30
Facebook, WhatsApp and Instagram Server Down: समोर आलं Facebook Server बंद होण्याचं कारण. संपूर्ण जगाला तब्बल ११९२.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान.
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर (Whatsapp, Instagram, Facebook and facebook messenger) पुन्हा सुरू झालं आहे. तब्बल सहा तास या तिन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडणींमुळे या तिन्ही सेवा बंद पडल्या होत्या. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली होती. परंतु आता या सेवा का बंद झाल्या याचं कारण आता समोर आलं आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यानंतर भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे.
या तिन्ही सेवा बंद होण्यामागचं कारण Facebook चं DNS म्हणजेच Domain Name System फेल होणं होतं. DNS फेल झाल्यामुळे फेसबुकपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या युझर्सचा इंटरनेट रूट बाधित झाला. DNS कोणत्याही वेबसाईटला आयपी ॲड्रेसमध्ये ट्रान्सलेट करुन युझरला त्या पेजपर्यंत पोहोचवतो, जे पेज त्या युझरला उघडायचं आहे.
का फेल झाला DNS ?
फेसबुकचा DNS फेल होण्यामागे जाणकारांच्या मते Facebook चे सर्व BGP (Border Gateway Protocol) थांबले होते. यामुळे सर्व DNS फेल झाले आणि संपूर्ण जगात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम ठप्प झाले. BGP रुटच्या मदचीनं DNS आपलं काम करतो. परंतु BGP थांबवण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कर्मचाऱ्यांनाही समस्या
या तिन्ही सेवा ज्यावेळी बंद झाल्या त्यावेली फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला. त्यांच्या कार्यालयाची मेल सिस्टम आणि कर्मचाऱ्यांच्या ॲक्सेस कार्डनंही काम करणं बंद केलं होतं. यानंतर फेसबुकचे मुख्यं तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं लोकांची माफीही मागितली.
*Sincere* apologies to everyone impacted by outages of Facebook powered services right now. We are experiencing networking issues and teams are working as fast as possible to debug and restore as fast as possible
— Mike Schroepfer (@schrep) October 4, 2021
लॉक तोडून सर्व्हर रूममध्ये
अंतर्गत मेल सिस्टम बंद झाल्यानं आणि कर्मचाऱ्यांचं ॲक्सेस कार्ड न चालत असल्यानं फेसबुकनं आपल्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा डेटा सेंटरवर एक टीम पाठवली. बंद पडलेले सर्व्हर मॅन्युअली रिसेट करण्या करण्यासाठी आणि सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी देखील अॅक्सेस कार्ड न चालल्यानं टीमला सर्व्हर रूमचे लॉक तोडून आत जावं लागलं. समस्या दूर करण्यासाठी त्यांना फिजिकल अॅक्सेस आवश्यक होतं.
We’re now back and running at 100%.
— WhatsApp (@WhatsApp) October 5, 2021
💚 Thank you to everyone around the world today for your patience while our teams worked diligently to restore WhatsApp. We truly appreciate you and continue to be humbled by how much people and organizations rely on our app every day. 💚
कोट्यवधींचं नुकसान
या समस्येदरम्यान, फेसबुकनं अंतर्गत मेमो जारी केला आणि हा प्रकार जोखीम असलेला आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला जोखीम पोहोचवणारा असल्याचं म्हटलं. फेसबुकच्या महसूलात या समस्येमुळे या कालावधीत तब्बल ८० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५९६ कोटी रूपयांचे एकूण नुकसान झालं. तसं इंटरनेटवरील ग्लोबल ओब्झर्व्हरी 'नेटब्लॉक्स'च्या अंदाजानुसार संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला या समस्येमुळे १६० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ११९२.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झालं होतं.