नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:11 PM2022-12-07T15:11:48+5:302022-12-07T15:18:45+5:30
Amazon मध्ये नोकरी करण्यासाठी Google ची नोकरी सोडली, नंतर Amazon नेही जॉब ऑफर परत घेतली.
गेल्या काही दिवसांपासून आयटी कंपन्यांच्या लेऑफच्या म्हणजेच, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या बातम्या समोर येत आहेत. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नाराळ दिले. यातच Google सारख्या कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाची फार वाईट अवस्था झाली. Amazone या कंपनीने त्याची इतकी मोठी फसवणूक केली, त्याची अवस्था 'ना इधर का, ना उधर का' अशी झाली आहे.
या इंजिनिअरने स्वत: LinkedIn वर एक पोस्ट शेअर करून आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल- 'असं कुणासोबत होऊ नये'. त्याने आता गूगल आणि अॅमेझॉन, दोन्ही नोकऱ्या गमावल्या आहेत आणि आता त्याच्याकडे फक्त 60 दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान त्याला दुसरी नोकरी मिळाली नाही, तर मायदेशात परतावे लागेल.
नेमकं काय झालं?
गूगलमध्ये काम करणाऱ्या Tianyi Gao नावाच्या तरुणाने काही काळापूर्वी अॅमेझॉनमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याने परीक्षा आणि मुलाखतीच्या सर्व फेऱ्या पार करून नोकरी मिळवली. अॅमेझॉनने ऑफर लेटरही पाठवले. हे पत्र मिळाल्यानंतर तियानी गाओ याने गूगलचा राजीनामा दिला. गुगलने राजीनामा स्वीकारला आणि तियानीने नोटिस कालावधीची सेवा सुरू केली.
त्याच्याकडे अॅमेझॉन जॉईन करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी होते. अधिक पगार आणि नवीन जॉब प्रोफाइलबद्दल तो खूप आनंदी आणि उत्साहाने भरलेला होता. याताच त्याला एक ईमेल आला, ज्यात अॅमेझॉनने नोकरीची ऑफर मागे घेत असल्याचे सांगितले. हा ईमेल तियानीसाठी धक्कादायक होता.
तो म्हणाला की, 'मी आता गुगलला माझा राजीनामा मागे घेण्याची किंवा प्रक्रिया पुढे नेण्याची विनंती करू शकत नाही, कारण उशीर झाला आहे. आज माझा Google चा शेवटचा दिवस आहे. मी H1B व्हिसावर काम करतोय. दुसरी नोकरी शोधण्यासाठी माझ्याकडे फक्त 60 दिवस आहेत. नोकरी मिळाली तर ठीक, अन्यथा मला माझ्या देशात परत जावे लागेल.' त्याच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.