फायरफॉक्स ब्राऊजरवर आता लुटा व्हर्च्युअल रिअॅलिटीचा आनंद
By शेखर पाटील | Published: August 8, 2017 04:51 PM2017-08-08T16:51:56+5:302017-08-08T16:52:12+5:30
मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे.
मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे.
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स ब्राऊजरचे व्हर्जन ५५ जारी केले आहे. यात अनेक नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी अर्थात आभासी सत्येतेचा सपोर्ट होय. ताज्या अपडेटमध्ये ऑक्युलस रिफ्ट आणि एचटीसी व्हाईव्ह या व्हिआर हेडसेटच्या वापराला संलग्न करण्यात आले आहे. अर्थात याला वेबव्हिआरचा सपोर्टदेखील मिळाला असून याच्या मदतीने आभासी सत्यतेत विविध कंटेंटची अनुभुती घेता येणार आहे. आधीच गुगलचे क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज या ब्राऊजरवर व्हर्च्युअल रिअॅलिटी देण्यात आला असतांना आता मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरनेही ही सुविधा प्रदान करत या स्पर्धेत उतरण्याची घोषणा केली आहे. वेबवरून व्हिआरची अनुभुती घेण्याच्या प्रमाणात वाढत होत असतांना, आणि खरं तर एकंदरीतच या प्रकारातील कंटेंटच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वृध्दी होत असतांना मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरने काळाची पावले ओळखत याला संलग्न केल्याचे मानले जात आहे. सध्या फक्त दोन व्हिआर हेडसेटचा सपोर्ट असला तरी येत्या काही दिवसांत अन्य हेडसेटही याच्याशी संलग्न करण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत स्क्रीनशॉट हे नाविन्यपूर्ण फिचरदेखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही हवा तो स्क्रीनशॉट काढल्यानंतर याला हव्या त्या पध्दतीने संपादीत करून विविध माध्यमातून शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तसेच नवीन आवृत्तीत सुरक्षाविषयक अनेक त्रुटींना दुरूस्त करण्यात आले आहे. ८ ऑगस्ट रोजी मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरची ५५वी आवृत्ती बीटा अवस्थेत युजर्सला प्रदान करण्यात येत असून येत्या काही दिवसात सर्व वापरकर्त्यांना याला अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात येईल असे जाहीर झाले आहे.