मनोरंजनाचे बजेट कोलमडणार; DTH, केबलसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे
By हेमंत बावकर | Published: February 1, 2019 03:05 PM2019-02-01T15:05:43+5:302019-02-06T20:16:36+5:30
पहिल्या 100 चॅनेलसाठी 130 रुपये अधिक जीएसटी असे 154 रुपये मोजावे लागणार असले तरीही त्या चॅनेलमध्ये एकही चॅनेल पाहिला जात नाही.
- हेमंत बावकर
मुंबई : केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एकीकडे मध्यमवर्गीयांना दिलासा दिलेला असताना दुसरीकडे मात्र ट्रायच्या नियमांमुळे मनोरंजनाचे मासिक बिल जवळपास तिप्पटीने मोजावे लागणार आहे. DTH, केबलवर पसंतीचे चॅनेल निवडीचा निर्णय वरवर योग्य जरी वाटत असला तरीही तो खिसा रिकामा करणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.
पहिल्या 100 चॅनेलसाठी 130 रुपये अधिक जीएसटी असे 154 रुपये मोजावे लागणार असले तरीही त्या चॅनेलमध्ये एकही चॅनेल पाहिला जात नाही. यामुळे जर तुम्ही मराठीचे सर्व चॅनेल काही कारटून चॅनेल असे पकडून अंदाजे 15 ते 20 चॅनेल जरी निवडले तरीही तुम्हाला आधीसारखेच भरमसाठ चॅनेल एवढे पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय हिंदी मनोरंजन आणि सिनेमाचे चॅनेलसाठी पुन्हा वेगळी खरेदी करावी लागणार आहे. असे एकूण 30 ते 40 चॅनेल जरी निवडले तरीही महिन्याला 300 ते 350 रुपये येणारे बिल आरामात 500 ते 600 रुपयांवर जाणार आहे.
केबल चालकांनी ग्राहकांना एफटीएमध्ये 100 चॅनेलची यादी दिली आहे. तसेच पसंतीच्या चॅनेल निवडीसाठी फॉर्म दिला आहे. खाली दिलेला फॉर्म हा मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये केबल सेवा देणाऱ्या पुरवठादाराचा आहे. यामध्ये मराठीच्या 9 चॅनेलसाठी 80 रुपये आणि 18 टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. यामध्ये हिंदी, स्पोर्टस्, किड्स आणि म्युझिकचा कोणताही चॅनेल घेतलेला नाही.
आपल्या घरामध्ये लहान मुलापासून वृद्धांपर्यंत किमान 4 ते 5 जण असतात. यामुळे त्यांची पसंत वेगवेगळी असते. गृहीणींना मालिका, लहान मुलांना कारटून, तरुणांना खेळ- सिनेमा, वृद्धांना धार्मिक चॅनेल हवे असतात. हे एकत्रित प्रकेज याआधी 300 ते 400 रुपयांत मिळत होते. मात्र, आता नव्या नियमांनुसार चॅनेल निवडल्यास हा खर्च 500 ते 700 रुपयांवर जाणार आहे. यामुळे ग्राहकांमध्ये आधीच संभ्रम असून नाराजीही आहे. पहिल्या 100 चॅनेलमध्ये पाहण्यासारखे चॅनेलच नसतील तर त्यासाठी 154 रुपयांची नेटवर्क कॅपॅसिटी फी म्हणून का द्यावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड?
...तर केबल, डीटीएच बंद करण्याचा पवित्रा
दर महिन्याला येणारा 300 ते 400 रुपयांचा खर्च 500 ते 700 रुपयांवर जाणार असेल तर एवढे पैसे मोजण्यापेक्षा केबल, डीटीएच बंद केलेले बरे, अशा मतापर्यंत ग्राहक आलेला आहे. शिवाय घरी इंटरनेट, वायफाय कनेक्शन असेल तर या चॅनलच्या ब्रॉडकास्टर्स अॅप किंवा काही कंपन्यांच्या अॅपवर मोफत या मालिका, चॅनेल पाहता येतात. तसेच 3 ते 4 हजारात मिळणारी छोटी उपकरणे साध्या एलईडी टीव्हीला जोडल्यास टीव्ही स्मार्ट बनविता येतो. यावर अॅपद्वारे मालिका, चॅनेल पाहता येतात, असेही काही ग्राहकांनी सांगितले.